Top 5देश - विदेश

‘स्मार्ट शहरे, स्मार्ट शहरीकरण’मध्ये सर्वोत्कृष्ट PCMC

भारत सरकार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या कामगिरीबद्दल सुरत येथे ओपन डेटा विक, क्लायमेट चेंज आणि प्लेस मेकिंग या तीन विविध पुरस्कारांनी मंगळवारी सन्मानित करण्यात आले आहे.

पिंपरी : सुरत (गुजरात) येथे १८ ते १९ एप्रिल २०२२ रोजी ‘स्मार्ट शहरे : स्मार्ट शहरीकरण’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पिंपरी – चिंचवडने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत स्मार्ट सिटी मिशनचे जॉइंट सेक्रेटरी आणि मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील व सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारले.

‘ओपन डेटा विक इव्हेंटमध्ये’ पिंपरी-चिंचवडने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, तर प्लेस मेकिंग या प्रकारात ७५ तासांत तयार करण्यात आलेल्या सुदर्शन चौकातील ८ टू ८० पार्कला प्लेस मेकिंग मॅरेथॉन विजेता पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.

तसेच, ऊर्जा आणि हरित इमारती, शहरी नियोजन, हरित आवरण आणि जैवविविधता, गतिशीलता आणि हवेची गुणवत्ता, जलव्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन या पाच श्रेणींमध्ये ठरवून दिलेल्या २८ निकषांनुसार चांगली कामगिरी केल्यामुळे क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.० मध्ये ५ पैकी ४ स्टार मिळवून पर्यावरण संतुलन राखण्यात मोलाची कामगिरी केल्याबद्दल क्लायमेट चेंज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, आयुक्त राजेश पाटील यांनी ह्यूमन स्क्रेलिंग द पब्लिक रियल्म या विषयावर मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व प्रशासनाची कार्यपद्धती याविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच, महापालिकेचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी पाथ-वे टू नेट झिरो या विषयावर स्ट्रीट फॉर पीपल्स व इंडिया सायकल फॉर चेंज हे उपक्रम राबवित असताना आलेले अनुभव विशद केले.

भारताच्या शहरी परिसंस्थेमध्ये नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ओपन डेटाचा अवलंब करण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा एक भाग म्हणून देशभरात १७ ते २१ जानेवारी २०२२ दरम्यान ‘ओपन डेटा वीक’ इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेत एकूण ६२ शहरांनी सहभाग नोंदविला होता. तर, ५२ शहरांनी स्कोडपवर डेटासेट आणि डेटा स्टोरी अपलोड केल्या होत्या. तसेच ३८ शहरांनी डेटा डे चे आयोजन केले होते. सहभागी शहरांनी स्कोडपवर १३०० हून अधिक डेटासेट आणि २५ कथा प्रकाशित करण्यात योगदान दिले. तर डेटा डे इव्हेंटमध्ये सरकारी एजन्सी, शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, स्टार्ट अप्स, मीडिया हाऊसेस, तसेच नागरिकांमधील सुमारे १० हजार भागधारकांचा जबरदस्त सहभाग दिसून आला. दोन उपक्रमांमधील विविध पॅरामीटर्सच्या आधारे मूल्यमापन केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या १० शहरांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची ओपन डेटा विक इव्हेंटमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांपैकी एक’ म्हणून निवड झाली आहे. या उपक्रमांसाठी नागरिकांचा सहभाग आणि महापालिका व स्मार्ट सिटीचे अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा बहुमान मिळाल्याचे आयुक्त राजेश पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये