…. तोंड दाखवू नका : राम सातपुतेंच्या दमबाजी ची भाजपात नाराजी
कार्यकर्ते आहेत की घरगडी ? नेटकर्यांकडून ट्रोल
सोलापूर | सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत असताना , ‘ काम केले नाही तर तोंड दाखवू नका ‘ , ‘ पुन्हा माझ्याकडेच यायचे आहे … ‘ अशा शिरेबाजीसह अनेक इशारे दिले . या बैठकीतील त्यांची काही वक्तव्य अशी – मला मोठे मताधिक्य पाहिजे , देणार ना ? देणार ना धर्मा ….. ? उठ ! , तुला जे पैसे आलेत ना ते पार्टीचे आलेत मताधिक्य पाहिजेच . याची व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात वायरल झाली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनीही त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले . पक्षाचे कार्यकर्ते आहेत का घरगडी ? अशाही प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या . त्यांच्या या उघड दमबाजीची धास्ती आता भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतली असून ‘ आत्ताच ही भाषा , तर निवडून आल्यावर काय व्हायचे ‘ अशी चर्चा आता जिल्ह्यातील भाजपामध्ये सुरू आहे.
आधीच उपरा उमेदवार लादला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे .
राम सातपुते यांच्या बद्दल व्यापक जनमत नाही . माळशिरस तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये त्यांचे काम नाही आणि त्यांचा संपर्क देखील नाही. परंतु केवळ पक्षश्रेष्ठाने लादलेला उमेदवार म्हणून भाजपची दुसरी फळीतील कार्यकर्ते त्यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यापूर्वीचे दोन्ही खासदार हे अत्यंत निष्क्रिय असल्यामुळे आधीच जनतेमध्ये रोष आहे . अशात पुन्हा भाजपा उमेदवार सातपुते यांच्यासारख्या बाहेरच्या उमेदवाराबद्दल पुन्हा मत मागण्यासाठी कशीतरी यंत्रणा उभी राहत आहे. परंतु या सर्वांचा विचार न करता कार्यकर्त्यांनाच दमबाजी आणि शेरेबजी करणाऱ्या सातपुते यांना काही संवेदना आहेत की नाहीत ? अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
पुन्हा कामाला माझ्याकडेच यायचे आहे ….., काम केलं नाही तर तोंड दाखवू नका…. , ये तू खाली बस ! अशा प्रकारची शेरेबाजी सहन करण्याच्या मानसिकतेमध्ये कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही नाराजी सातपुते यांना भोवणार असल्याचे समजते.