पी. बी. जोग शाळा बंद होणार! आरटीईमधून कुठे प्रवेश मिळणार, पालकांसमोर मोठा प्रश्न!
पुणे | पुणे शहराला विद्येचे माहेर घर म्हटले जाते. शहरात सीबीएससी अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळा अगदी बोटावर मोजण्याइतक्याच आहेत, तसेच इंग्रजी शाळासुद्धा कमी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पी. बी. जोग प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव मोठे. मात्र या शाळेत शिकणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कोथरूड व सिंहगडरस्ता येथील दोन्ही शाळा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशातच आरटीईमार्फत सीबीएससीचा अभ्यासक्रम शिकलेल्या मुलांना आता आरटीईमधून कुठे प्रवेश मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. या शाळांमधील आरटीईअंतर्गत ४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले आहेत. २५ टक्के आरक्षित कोट्यातून प्रवेशित ४४ विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश मिळणार का, अशी चिंता पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
पी. जोग शाळेतील पालक आणि आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत, अॅड. अमोल काळे आदींनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य त्यांना निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांचीही पालकांनी भेट घेतली आणि या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची मागणी केली.
यासंदर्भात नाईकडे म्हणाले, पी. जोग शाळेतील आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांची व्यथा मांडली. या विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश देण्याची पालकांची मागणी आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने ३ किलोमीटर परिसरातील शाळांची यादी तयार केली आहे. त्यानुसार जवळपास ४४ विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश दिले जाणार असल्याचे सांगितले.