ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘AU’ कोण आहे?, रिया चक्रवर्तीचा ‘त्या’ व्हायरल व्हिडीओतून खुलासा

मुंबई | Rhea Chakraborty – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आदित्य ठाकरेंचा समावेश असल्याचा आरोप राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं आहे, असा गंभीर आरोप राहुल शेवाळेंनी लोकसभेत बोलताना केला होता. शेवाळेंनी केलेल्या या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच रियाच्या मोबाईलवर फोन आलेली AU ही व्यक्ती नेमकी कोण आहे? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. या दरम्यान, स्वत: रियानंच याबाबत खुलासा केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये राजदीप सरदेसाईंनी रियाला आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप होत असल्याबद्दल विचारणा केली होती. त्यावर उत्तर देताना रिया चक्रवर्तीनं AU नेमकं कोण आहे? याचा खुलासा केला होता. “या प्रकरणाचा तपास हटवण्याची मागणी जेव्हा मुंबई पोलिसांकडून केली जाते, तेव्हा मुंबई पोलीस दबावाखाली असल्याचं सांगितलं जातं. पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे?” असा प्रश्न रिया चक्रवर्तीला विचारण्यात आल्यानंतर त्यावर तिनं उत्तर दिलं.

“माझ्याकडे या सगळ्या चर्चांचं उत्तर नाहीये. माझ्यावर होत असलेल्या आरोपांपैकी हा एक आरोप आहे. माझी एक मैत्रीण आहे. तिचं नाव अनाया उदास असून तिचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये AU या नावानं सेव्ह आहे. पण सगळे म्हणतात त्याचा अर्थ आदित्य उद्धव आहे. मात्र, यावर अनायानं खुद्द स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यावर आम्हीही स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही वारंवार हे म्हटलं जातं की ते आदित्य ठाकरे आहेत”, असं रियानं म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग असून ते रिया चक्रवर्तीला संरक्षण देत असल्याचाही आरोप तेव्हा केला गेला होता. त्यावरही रियानं स्पष्टीकरण दिलंय. “मी आजपर्यंत त्यांना कधीही भेटले नाही. त्यांच्याशी माझं कधी बोलणंही झालेलं नाही. त्यांचा माझ्याकडे नंबरही नाहीये. कुणीही मला संरक्षण देत नाहीये. मी तर म्हणतेय मला कुणीतरी संरक्षण द्या”, असंही रिया म्हणाली होती. तसंच तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिवसेना नेत्या संजना घाडी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये