राजकीय नेते गावबंदीचं पोस्टर फाडल्याने वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, सरपंचासह सात जण जखमी; मनोज जरांगेंकडून कारवाईची मागणी
Jalna :
जालना (Jalna) जिल्ह्यात गावबंदीचा पोस्टर फाडल्याने दोन गटात वाद झाल्याची घटना समोर येत आहे. गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आलेले पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या गटाने हे पोस्टर फाडल्याने दोन्ही गटात वाद झाला. ज्यातून थेट हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात ही घटना घडली आहे. या घटनेत सात तरुण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच, सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, पोस्टर फाडणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या लोकांवर गंभीर कारवाई करण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.
मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत गावागावात राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे पोस्टर लावण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले होते. त्यानुसार, जालन्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात देखील राजकीय नेत्यांना गावबंदी करणारे बॅनर लावण्यात आले होते. सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात हा प्रकार कैद झाला होता. त्यामुळे बॅनर का फाडले याबाबत गावातील एका गटाच्या पुढार्याला जाब विचारण्यात आला. त्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारीचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या हाणामारीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेले काही मराठा तरुण आणि सरपंच गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
भोकरदन येथील घटनेची मनोज जरांगे यांनी देखील दखल घेतली आहे. मराठा तरुणांना मारहाण करत असाल तर आम्ही देखील शांत बसणार नाही. आम्ही देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, त्यामुळे जालना पोलीस अधीक्षक यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. जे कोणी मारहाण करणारे गावगुंड असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. गावगुंडची भाषा आम्हाला शिकवू नयेत. मारहाण करणाऱ्यांसोबतच त्यांच्या नेत्यांना देखील आतमध्ये टाका. गोरगरिबांवर झालेला अन्याय मराठे खपून घेणार नाही. या लोकांना अटक करून आतमध्ये टाकलं नाही, तर आम्ही राज्यभरात आंदोलन करू असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. सोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश देण्याची मागणी देखील जरांगे यांनी केली आहे. जखमीवर छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.