मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का; बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा …
Sunil kedar :
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सुनिल केदार आणि इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टानं सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष) यांच्यासोबत केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी ठरवलं होते.
सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर सुनील केेदार यांना सौम्य शिक्षेची मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. सुनिल केदार हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी असा युक्तीवाद केदार यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने केदार यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
सुनील केदार आणि इतर आरोपीना सेक्शन 409 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर कलम 471 नुसार 1 वर्षाची शिक्षा सुनावली गेली आहे. तर कलम 468 मध्ये ही 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या सर्व शिक्षा सोबत भोगायच्या आहेत. त्यामुळे एकूण शिक्षा 5 वर्ष भोगावी लागेल. याशिवाय विविध कलमान्वये साडे बारा लाखांचा दंडही ठोठावला गेला आहे.
2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेयर्स) खरेदी केले होते. या सर्व कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही,कारण ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. धक्कादायक म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे. तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडी कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. आणि हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता.