“तुरूंगात जाईन पण…”, सुषमा अंधारेंचा थेट नीलम गोऱ्हेंना इशारा
Sushma Andhare | उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंची माफी मागितली नाही तर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेंना आठ दिवसात माफी मागा नाहीतर हक्क भंगाच्या प्रस्तावाला मान्यता देऊ असा इशारा दिला होता. या इशाऱ्यावर आता अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तुरूंगात जाईन पण माफी मागणार नाही, अशी भूमिका सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंना पत्र लिहून मांडली आहे.
सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेंना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, जर माझ्याकडून एखादा गुन्हा घडला असता तर मी बिनशर्त माफी मागितली असती. पण पक्षीय राजकारणातील कुरघोडीचा भाग म्हणून कोणी मला झुकन्याचा प्रयत्न होत असेल तर मी माफी मागणार नाही. यासाठी मला तुरूंगात पाठवलं तरी मी जाईन पण माफी मागणार नाही.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनादरम्यान, सुषमा अंधारेंनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या मुद्द्यावरून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारेंवर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. तर येत्या आठ दिवसांमध्ये दिलगिरी पत्र द्यावं अन्यथा त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची परवानगी देऊ, असा इशारा नीलम गोऱ्हेंनी दिला होता.