अग्रलेखरणधुमाळीसंपादकीय

राग मियाँकी तोडी

सबब शरद पवार हे भाजप व मनसे बारामतीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत आणि ताकद लावून सुप्रिया सुळे यांना हे पक्ष अडचणीत आणणार, हे समजल्याने ते काळजीत असावेत. समष्टीने सुरुवात करून व्यष्टीवर मुद्दा आणायचा हा प्रकार पवार यांचा असू शकतो. राजकारणात जे दिसते ते तसे कधीच नसते. शरद पवार यांचा मियाँकी तोडी राग मोदी विरोधातले पक्ष एकत्र करण्यासाठी वरवर दिसत असला तरी बारामती बचाव यासाठी तो जास्त असावा.

संपादकीय विशेष |

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे मियाँकी तोडी राग गायला पुन्हा एकदा. या रागाचे बोल, भाजप हे वॉशिंग मशिन आहे.सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. लोकशाही खतरेमें हे आहेत. हे बोल गेली आठ वर्षे आळवले जात आहेत. ना ऐकणाऱ्यांत फरक पडला ना आळवणाऱ्यात. दोन, तीन महिने झाले, की मियाँकी तोडी गायची हा आता प्रघात झाला आहे हे मात्र नक्की.

शरद पवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सत्तानाट्याच्या काळात प्रतिक्रिया अथवा ज्या तीव्रतेने कृती होणे अपेिक्षत होती ती झाली नाही. त्यांना एक बाब नक्की माहिती होती, की इतक्या टोकाला गेलेली मंडळी समजुतीच्या पलिकडे असतात आणि एकदा सत्ता ताब्यात घेण्याच्या इतक्या जवळ आलेली मंडळी सत्ता सोडणार नाही, हे त्यांच्या स्वानुभवावरूनही माहिती असल्याने कदाचित त्यांनी गेला महिनाभर महाराष्ट्रात काही बोलण्याची घाई केली नसावी. मात्र दिल्लीत गेल्यावर त्यांनी भाजपविरोधकांना साद घालत पुन्हा एकदा मोदी सरकारला आपल्या ताकदीनिशी ललकारले आहे. त्यांच्या या ललकारीयुक्त रागाचा कितपत फायदा विरोधकांना होईल, हे आगामी काळात समजेलच. मात्र नितीशकुमार आणि तेजस्वी यादव किंवा ममता बॅनर्जी यांच्या अापापल्या विवंचनांतून राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण करण्यासाठी ते कितपत उत्सुक असतील हे समजत नाही.

विरोधक कितपत मोदी विरोधक राहतील आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक ताकदीने लढतील, याची खात्री दस्तूरखुद्द शरद पवार यांनाही नसावी. यंत्रणांचा वापर ही बाब िवचारात घेतली तर बिहारमध्ये शक्तिप्रदर्शन होत असताना राजकारणी आणि उद्याजकांच्या घरावर धाडी पडायला सुरुवात झाली आहे. हे काम भाजप करीत असेल तर विरोधक परत किती काळ टिकतील, हा मुद्दा आहे. त्यातून बिहारच्या विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा देत पुन्हा एकदा घटनात्मक पेच निर्माण करीत नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांना धोबीपछाड घातला आहे.

आता शरद पवार कितीही कंठशोष करीत असले तरी आणि ते खरे असले असे गृहित धरले तरी भाजपच्या सत्ताकांक्षेपुढे ही मंडळी फार काळ टिकणार नाहीत.नितीशकुमार, ममता बॅनर्जी, शरद पवार किंवा दक्षिणेतली प्रादेशिक पक्षांची राज्ये हळूहळू भाजपसमोर नतमस्तक होतील, जमवून घेतील.

आता हे लोकशाहीला पूरक, योग्य आहे का, या प्रश्नाला आदर्श उत्तर ‘नाही’ असे असले तरी घोटाळ्यातल्या आदर्शपासून राजकीय तत्त्वांच्या आदर्शपर्यंत आदर्श काही राहत नाही, हे वास्तव आहे. सत्ता मिळवण्यासाठी मिळेल ती संधी आणि ती मिळाल्यावर शक्यतो मोका कोणी सोडत नाही. भले ते लोकशाहीप्रणित हुकूमशाहीचा असो किंवा लोकशाहीच्या तत्त्वांना बहुमताने मोडीत काढीत सत्ता मिळवणे असो. राजकारण करणारा प्रत्येक जण मियाँकी तोडी राग आळवतो आणि दुसऱ्याने तो आळवू नये, असे आग्रहाने सांगतो.

सबब शरद पवार हे भाजप व मनसे बारामतीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत आणि ताकद लावून सुप्रिया सुळे यांना हे पक्ष अडचणीत आणणार, हे समजल्याने ते काळजीत असावेत. समष्टीने सुरुवात करून व्यष्टीवर मुद्दा आणायचा हा प्रकार पवार यांचा असू शकतो. राजकारणात जे दिसते ते तसे कधीच नसते. शरद पवार यांचा मियाँकी तोडी राग मोदीविरोधातले पक्ष एकत्र करण्यासाठी वरवर दिसत असला तरी बारामती बचाव यासाठी तो जास्त असावा. तेव्हा स्वार्थ परमार्थ साधणे हे पवार यांचे लक्ष्य असावे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये