क्राईमताज्या बातम्यापुणे

IPL वर सट्टा लावणाऱ्या दहा जणांना कोथरूडमधून अटक

पुणे | सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या १० सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. सोमवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कोथरूड येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई केली आहे. उजवी भुसारी कॉलनीत ही कारवाई करण्यात आली असून एका इमारतीत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी सट्टेबाजांकडून लॅपटॉप, मोबाइल संच व काही रोख जप्त केली आहे.

मुकेशकुमार शैलेंद्रकुमार साहू (वय २४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय २१), जसवंत भूषणलाल साहू (वय २२), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय २६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय २३), संदीप राजू मेश्राम (वय २१), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय २४), मोहम्मद ममनून इस्माइल सौदागर (वय ३२), अमित कैलास शेंडगे (वय ३२) या सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम हे छत्तीसगडचे रहिवाशी आहेत. तर या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण ढमाळ यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात आयपीएलचा हंगाम सुरू आहे. यात विविध संघांचे सामने सुरू आहेत. याच सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोथरुडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील पटेल टेरेस इमारतीत हा सट्टेबाजीचा खेळ सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पथकांची स्थापना करून अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सुचनेनुसार त्या ठिकाणी धाड टाकली. या ठिकाणी क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या १० जणांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपींजवळून लॅपटॉप व मोबाइल संच आणि काही रोख असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये