देश - विदेशरिअलिटी चेकलेखसंडे फिचर

आपत्ती व्यवस्थापन चोख हवे

पावसाळा हा रम्य ऋतू असला तरी ‘पावसाचा पॅटर्न’ बदलल्यामुळे अलिकडच्या काळात आपण अनेक दुर्घटना अनुभवल्या आहेत. पावसाळ्याची सुरुवात ही सणांच्या पर्वाचीही सुरुवात असते. यंदा तर तब्बल दोन वर्षांनंतर पूर्वीच्या उत्साहात होणारे सणांचे साजरे होणे अधिकच धामधुमीचे असेल. म्हणूनच या काळातील संभाव्य आपत्तींची शक्यता लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन केल्यास धोके टळू शकतात.

आपत्ती कधीही सांगून येत नाही. त्यामुळेच अनुभवातून शहाणे होत, मागील चुकांची पुनरावृत्ती टाळत, संकटांवर मात करीत पुढे जायचे असते. हाच नियम सध्याच्या काळालाही लागू आहे. विशेषत: पावसाचे तंत्र बदलले असण्याच्या या काळात पावसामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची गरज ठाशीवपणे जाणवणारी आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचा ‘पॅटर्न’ बदलल्यासारखी स्थिती आपण अनुभवत आहोत. कमी कालावधीत अधिक पाऊस, ढगफुटी, ठराविक पट्ट्यात अतिरेकी पाऊस होणे, पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गटारे भरून वाहिल्यामुळे होणारे अपघात, पाणी साचून होणारी जीवित वा वित्तहानी अशी एक ना अनेक उदाहरणे या आपत्तीचे रौद्र रुप दाखवून देऊ शकतील.

अगदी उत्तराखंडमधल्या हाहाकारापासून एखादी खिळखिळी इमारत कोसळून होणार्‍या दुर्घटनेपर्यंत अनेक अनुभव आपण दरवर्षी पचवतो. रेल्वे बंद पडणे, दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूल वाहून जाणे यांसारखी अपघातांची तर गणनाच नसते. या पार्श्वभूमीवर दमदार पावसाला सुरुवात होण्याच्या या काळात यंदा तरी अशा अपघातवार्ता कानी पडू नयेत, अशी इच्छा असेल तर पावसाळ्यातल्या आपत्ती व्यवस्थापनाचा विषय गांभीर्याने घ्यायला हवा.

दरवर्षी सरकार आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही सूचना मागवत असत. त्यात नागरिक आपापल्या भागातल्या समस्यांची जंत्री मांडतात. तथापि, त्यावर विचार होऊन अंमलबजावणीच्या पातळीवर प्रगती होणे गरजेचे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

मुंबईत जरासा पाऊस पडला तरी रस्त्यांवर पाणी साठते. मुंबईच नव्हे, तर राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये अशी स्थिती बघायला मिळते. डांबरी रस्त्यांचे क्षेत्रफळ वाढल्याने हे होत आहे. मुंबईची सध्याची सांडपाणी वाहून नेणारी प्रक्रिया ७५ वर्षांपूर्वी बांधली आहे. एवढ्या वर्षात या प्रक्रियेचा विस्तार करण्याचे प्रयत्न झाल्याचे आढळत नाही. सांडपाणी वाहून नेणारी मुंबईसारखी यंत्रणा जपानमधल्या टोकियो शहरात ५० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. परंतु त्यात बदल करण्यात आले. टोकियोमध्ये दोन बाय दोन किंवा तीन बाय तीन आकाराचे मार्ग तयार करण्यात आले. या मार्गांमधून पाणी समुद्रात जाण्याची व्यवस्था करण्यात आली.

त्यासाठी साधारणत: दीड ते दोन मीटर डायमीटरचे पाईप जमिनीखालून टाकून त्यातून पाणी समुद्रात सोडण्यात आले. या पाईपना असणारे व्हॉल्व्ह एकाच वेळी आणि एकाच दिशेने उघडतील, अशी व्यवस्था करण्यात आली. या पाईपलाईनमधून पाणी समुद्रात जाते, परंतु समुद्राचे पाणी पाईपलाईनमध्ये येत नाही. अशा रीतीने सांडपाण्याचा निपटारा जलदगतीने होतो.
त्या तुलनेत मुंबईच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणार्‍या यंत्रणेचा विचार करायचा तर हे पाणी पाईपलाईनमधून समुद्रात सात ते आठ मीटर खोलीवर सोडले जाते. हेच पाणी भरतीच्या वेळी शहराच्या सखल भागात येते. टोकियोच्या पद्धतीने मुंबईच्या सांडपाण्याबाबत उपाययोजना करायला हवी आहे.

पावसाळ्यातले आणखी एक संकट म्हणजे दरडी कोसळणे. यापूर्वी दरडी कोसळण्याचा प्रकार प्रामुख्याने कोकण भागात होत असे. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे महामार्गांची निर्मिती करण्यात आली. अशा बांधकामांसाठीही मोठमोठे खडक फोडावे लागतात. डोंगर उभे कापावे लागतात. बोगदे बांधण्यासाठी डोंगर पोखरावा लागतो. या सगळ्यामध्ये खडकांमध्ये भेगा निर्माण होतात. या भेगांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास ते आपल्या जागेवरून सरकतात. यालाच आपण दरडी कोसळणे असे म्हणतो. हे टाळण्यासाठी फोडलेला दगड हा सरळ ९० अंशांत नसावा, असे सांगितले जाते. तो तसा असल्यास दरडी कोसळण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी दगड १०० ते १०५ अंशात असल्यास दरड कोसळण्याची शक्यता कमी असते.

रस्त्यालगतच्या दरडी कोसळू नयेत, यासाठी जाळीचे पडदे लावण्यात येतात. शास्त्रीय भाषेत यालाच ‘गॅबिऑन’ असे म्हणतात. या जाळ्यांमुळे दगड कोसळण्यास अटकाव होतो. त्यातूनही दगड कोसळल्यास ते जाळीला अडकतात. साहजिक ते वेगाने रस्त्यांवर येत नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. समुद्रकिनार्‍यालगत धूप थांबवण्यासाठी या जाळ्यांचा विशेष उपयोग होतो.

राज्यातल्या समुद्रकिनार्‍यांवर विविध प्रकारची चक्रीवादळे धडकत असतात. शिवाय धुळीचीही वादळे उठतात. परंतु दुर्दैवाने त्यासाठी सरकारला जबाबदार धरले जाते. यामागे राजकीय कारणे अधिक आणि वैज्ञानिक कारणे कमी असतात. याचे उदाहरण म्हणजे काही वर्षांपूर्वीची माळीणची दुर्घटना.

सरकारकडून काही प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असे बरेचदा कानी पडते. माळीणबाबत बोलायचे तर गावाच्या वर ७० मीटर उंचीवरील खडक घसरल्याने ती दुर्घटना झाली होती. त्यानंतर जुईनामक एक गावही डोंगराच्या कुशीत सामावलेले आपण पाहिले. वस्तुत: सरकारचे पडकाईचे काम सुरू असलेली जागा ही माळीण गावच्या खाली दहा ते १२ मीटरवर होती. त्यामुळे या कामाचा आणि माळीणच्या दुर्घटनेचा संबंध लावणे चुकीचे होते. परंतु तो लावून सरकारवर टीका करण्यात आली. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अयोग्य आहे.

दुसरीकडे, आपत्ती व्यवस्थापनाबाबत सरकार योग्य ती काळजी घेत नाही, हेही तितकेच खरे आहे. या काळात पार पडणार्‍या यात्रांमध्ये दुर्घटना घडतात आणि अनेक भाविकांचा जीव जातो. त्यानंतर मंदिरात होणारी भाविकांची गर्दी आणि त्यावरील नियंत्रण तसेच त्यासंदर्भातल्या उपाययोजनांबाबत बरेच बोलले वा लिहिले जाते. परंतु त्या घटनांपासून बोध घेत अन्य प्रमुख मंदिरांमध्ये दुर्घटना घडू नयेत, म्हणून काही उपाय करण्यात आल्याचे दिसत नाही.

नैसर्गिक कारणांमुळे वा मानवी चुकांमुळे, दुर्लक्षामुळे अनेक दुर्घटना घडत असतात. तथापि, बर्‍याचदा प्रशासनातल्या शैथिल्यामुळे दुर्घटना घडल्याचेही आढळले आहे. आता पायी वारी सुरू झाली आहे. या सोहळ्यासाठी विविध संत-महंतांबरोबर लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित राहणार आहेत. आषाढी वारीच्या काळात चंद्रभागा, इंद्रायणीतल्या स्नानासाठी भाविकांची मोठी झुंबड उडते. यावेळी चेंगराचेंगरी होण्याची आणि त्यातून काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबर नदीपात्रात जीवरक्षक तसेच नौका तैनात करण्यासारख्या उपाययोजनांवर भर दिला जायला हवा.

_प्रा. अशोक ढगे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये