पुस्तक जगतातलेखशिक्षणसंडे फिचर

कवितेचा गंध सर्वदूर पसरवणार्‍या ‘गंधपाकळ्या…’

वर्ष १९६१ पासून काव्यलेखन करणार्‍या आणि स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त असलेल्या नारायणानुज या कवीला जीवनाचा अर्थ कवितेतून शोधण्याची आस लागलेली आहे. साठोत्तरी मराठी कविता हा एक मराठी काव्यक्षेत्रातला मानाचा टप्पा मानला जातो आणि मराठीमधल्या अनेक दिग्गज कवींची गौरवशाली कारकीर्द याच काळात बहराला आली होती. त्या संपूर्ण सन्मान्य कालखंडाचा साक्षीदार असलेले भा. ल. कुलकर्णी म्हणजे नारायणानुज यांनी मराठी कवितेची ही पताका त्यांच्या खांद्यावर मानाने मिरवली आहे, असेच म्हणावे लागेल.

गली जिल्ह्यातल्या तडसरसारख्या आडवळणी खेड्यात राहूनही आपले भावविश्व आपल्या कवितेतून उभे करणारे नारायणानुज सारखे कवी म्हणजे मराठी शारदेच्या प्रांगणातील शिलेदार आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

‘आत्मतरंग’ या आपल्या पहिल्या कवितासंग्रहानंतर आता त्यांचा ‘गंधपाकळ्या’ हा नवा काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीला आला आहे आणि काव्यरसिकांना त्यांच्या अस्सल कवितांची अनुभूती पुन्हा एकदा मिळते आहे.

मी गातो जीवन गाणे
भाव मन प्रसन्नतेने
कर्तव्यपूर्तीने जगणे
मन प्रेमळ सौंदर्याचे

असे म्हणणारा हा आनंदाचे गाणे गाणारा कवी आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या मनोगतामध्ये कवी सांगतो की, आपलं जीवन खूप सुंदर आहे. मानवी जीवनाचे हळुवारपणे निरीक्षण केल्यास मनातील भाव-भावनांचे दर्शन होते. आपल्यातील गुणदोषांचे पृथ:करण करणे सहजशक्य होत असते. मनातील सद्गुणांचे संवर्धन आणि दोषांचे उच्चाटन केल्यास व्यक्तिमत्त्व सर्वांगसुंदर बनवता येते. त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भावी जीवन सौंदर्याने अलंकारित करणे, तसेच जनसेवाभाव जपत राहून त्याप्रमाणे प्रयत्नशील होत सुयश प्राप्त केले तर सौंदर्यवृद्धी नि माणुसकी प्रेम अंतरी जपत राहून पुढची वाटचाल ध्येयप्राप्तीकरिता सुलभतेने साकार होईल.

कराडच्या प्रा. डॉ. कोमल कन्हैया कुंदप यांची प्रस्तावना नारायणानुज यांच्या ‘गंधपाकळ्या’ या काव्यसंग्रहाला लाभलेली आहे. त्यामध्ये डॉ. कुंदप म्हणतात की, काव्यप्रतिभेने समृद्ध असणारे श्रीयुत भालचंद्र कुलकर्णी, की जे नारायणानुज या टोपणनावाने कवितांचा गुलदस्ता आपल्यासमोर आणला आहे. तडसरसारख्या ग्रामीण भागात राहून ग्रामीणतेची आणि तिथल्या संस्कारांची नाळ अजूनही जपून ठेवून समाजमनाच्या परिस्थितीचा आविष्कार जे आपल्या काव्यातून मांडतात, त्यांच्या कवितेत जीवन कसे आहे आणि ते कसे जगावे हे समजते आणि उमगतेही. मनाच्या भावना खोलवर जरी असल्या तरी त्याला हळुवार शब्दांकित करून जगण्याला बळ कसे प्राप्त करावे हे त्यांच्या कवितेतून दिसून येते.

भवसागर हा दु:खाचा
जिद्दीने पार करुया
माणुसकी प्रेम सुखाचा
मन मंत्र सर्वां देऊ या

असे म्हणणारे कवी नारायणानुज हे खर्‍या अर्थाने एक संवेदनशील कवी असल्याचे जाणवते. त्यांच्या संवेदनशीलतेचा साक्षात्कार अशा अनेक कवितांमधून होत राहातो. आता हेच पाहा ना…

स्वप्न माझ्या मनातले
होईल कधी साकार
जगातल्या गरिबांचे
सुखी होऊ दे संसार
सर्वांना न्याय मिळावा
जगी अन्यायाचा नाश
एकता शक्ती दाखवा
अंतरी देवा परमेशा

अशी सर्वसामान्यांच्या स्वप्नांची पूर्तता व्हावी म्हणून परमेश्वराला साकडं घालणारा हा कवी रसिकांना भावतो तो त्यामुळेच.
नारायणानुज यांच्या कवितेतून ’स्त्री’ ही कशाची रणरागिणी आहे आणि आपल्या असणार्‍या शक्तींना अंगीकारून आहे हे त्यांच्या, ’स्त्री शक्ती भाग्य देवता’ या कवितेतून दिसून येते. त्यामध्ये कवी म्हणतो की-

स्त्री जन्माची भाग्य देवता
प्रणाम अमुचा घ्यावा माते
प्रेम जीवन संग्रामाचे
कर्तव्यपूर्ती जीवन नाते

वेगवेगळ्या विषयांना बरोबर घेऊन कवी स्वराज्यरक्षणाचा मूलमंत्र आणि बीजमंत्र मानवी मनात खोलवर रूजवला तो त्यांच्या या कवितेत-

स्वराज्य किनारा जीवनाचा,
गाठायचा जनसेवा भावे।
साक्षात्कार स्वदेश प्रेमाचा,
जनजीवन हृदयी प्रेम वैभवे॥

मराठी कवितेला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदासांसारख्या संत कवींची परंपरा आहेच, शिवाय मराठी नवकवितेचे जनक केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले, युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस, शांता शेळके, इंदिरा संत अशा दिग्गज कवींनी कवितेचे दालन समृद्ध करून ठेवले आहे. त्या परंपरेचा मान राखण्याचा प्रयत्न करणारी कविता म्हणजे नारायणानुज यांची कविता आहे, असे नक्कीच म्हणता येऊ शकते.

आकाश तारकांनी सजवून रात्र आली
टिप्पूर चांदण्यांनी तेजस्वी धरणी झाली

अशा ओळी मनाची पकड घेतात. माणसामाणसांत आदर, प्रेमभाव, सहानुभूती, सहकार्यवृत्ती या सर्व सद्गुणांची सतत देवघेव वाढवत ठेवावी लागेल. मन:शांती, समाधान जोडावे लागेल. कर्तव्य कर्मकठोर मन बनवावे. म्हणजे यशस्वी जीवनवाट चालणे सोपे आहे.

सुविचारांचे मन चिंतन ईश्वर नामस्मरण
भक्तीचे सुंदर क्षण संवर्धन करणे योग्य आहे. मानवजन्म केवळ ईश्वरप्राप्तीसाठी आहे. याचे प्रत्येकाने स्मरण ठेवत त्याप्रमाणे प्रयत्न करणे ही खरी गरज आहे. आपल्या हातून सत्कार्याचे अथक प्रयत्न होणे चांगले लक्षण आहे. याचाच एक भाग मी काव्यलेखनाचे मूर्त स्वरूप सर्व मराठी वाचक रसिकांसमोर आणण्याचे योजिले आहे, असे कवी का म्हणतो त्याचा साक्षात्कार आपल्याला या पुस्तकातून होतो. म्हणूनच काव्यप्रेमींनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवणे आवश्यक आहे. अखेरीस कवीच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे-

निष्काम सेवाभाव मनी
प्रकाशदीप तेजस्विता
श्रीस्वामी समर्थ चिंतनी
प्रेम जीवन समर्पिता
हेच खरे.

पुस्तकाचे नाव – गंधपाकळ्या
कवी – नारायणानुज अर्थात भालचंद्र कुलकर्णी
किंमत – रु. १२०/-
प्रकाशक – भालचंद्र प्रकाशन, नाशिक

_श्रीनिवास वारुंजीकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये