“आरक्षण देणं हे केंद्राच्या हातात, पंतप्रधानांनी फोनवरून जरांगेंशी संवाद साधावा”; राऊतांचं मोठं वक्तव्य
मुंबई | Sanjay Raut : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसत आहे. यामध्ये आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसंच मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींनी जरांगेंशी संवाद साधायला हवा, असं वक्तव्य देखील राऊतांनी केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षण देणं हे केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी फोनवरून मनोज जरांगेंशी संवाद साधायला हवा. जरी उपमुख्यमंत्री दिल्लीला असले तरी ते जरांगेंसाठी नाही तर आमदारांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी जातात, अशी टीका राऊतांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी हे प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. तसंच अमित शहा मिझोराममध्ये फिरत आहेत. इकडे महाराष्ट्र पेटलेला आहे. जर जरांगेंच्या जीवाचं बरं वाईट झालं तर हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.