राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

स्वप्नांना सत्यात साकारणे कर्तृत्वाचे लक्षण

– विद्यावाचस्पती विद्यानंद

आपले अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य हे स्वप्न बघण्यातच जात असते. जगात एकही व्यक्ती अशी सापडणार नाही की, जी स्वप्न बघत नाही. अर्थात, दिवास्वप्न बघण्याचा प्रत्येकाला छंद असतो. झोपेत बघितलेली स्वप्नं आपल्याला जागेपणी आठवतातच असे नाही, तसेच जागेपणी बघितलेली स्वप्नंदेखील झोपेत दिसत आणि आठवत नाहीत. झोपेतील स्वप्न साकार होण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, कारण जाग आल्यावर ती आठवतच नाहीत. पण जागेपणी बघितलेले प्रत्येक स्वप्न साकारणे आणि त्यांना सत्यात उतरविणे शक्य होऊ शकते. स्वप्नावस्था ही आपल्या अंतर्मनाशी निगडित असते. ज्या गोष्टी अंतर्मनाला स्पर्श करतात, त्या नेमकेपणाची प्रचीती देत असतात.

आपल्या अंतर्मनांत येणारे आणि स्वप्नात बघितलेले विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असतो. तसं करण्यामुळे आपल्या मनांत साठून राहिलेल्या गोष्टी बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. निसर्गनियमानुसार ते गरजेचे असते. आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले की मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचेदेखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीनं मोकळेपणाने आपल्या मनांतील शंका व्यक्त करणे उपयुक्त ठरते. आपल्याला पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम आणि संभ्रमामुळे निर्माण होत असतात. प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सारखी नसतात, प्रत्येकाचे प्रश्न निराळे असतात, उत्तरेही प्रत्येकासाठी भिन्न असतात. जसे व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच, जसे आणि ज्यांचे प्रश्न तशी त्यांच्यासाठी उत्तरे. एखाद्या समस्येचे उत्तर सर्वांनाच लागू होते असे नाही, हेही समजून घेणे आवश्यक असते.

दैनंदिन आयुष्यांत स्वतःच्या अशा कितीतरी प्रकारच्या, आपले जीवन जगण्याच्या, नवनवीन कल्पना आपल्या मनांत येतात. प्रत्येकालाच असे वाटत असते की, आपले आयुष्य इतरांपेक्षा निराळे असावे. जगाने कौतुक करावे, असे आपले जीवन असावे. आपल्या प्रत्येकबाबतीत काही-ना-काही वेगळेपण असावे, असे अनेकदा आपल्याला वाटत असते. इतरांपेक्षा मी आणि माझी प्रत्येक गोष्ट भिन्न असण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यासाठी बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचा स्वीकार करावा लागतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये