मुंबई – पुणे प्रवास करता येणार फक्त ९० मिनिटात ! लवकरच सुरु होणार समुद्रावरील ‘हा’ पूल…
Mumbai-Pune :
भारतीय लोकसंख्या व औद्योगीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये रस्ते, रेल्वे तसेच मेट्रो सारख्या पायाभूत सुविधांची उभारणी खूप महत्त्वाची आहे व त्या दृष्टिकोनातून मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे उड्डाणपूल तसेच रस्ते प्रकल्प व मेट्रो प्रकल्पांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेले आहेत.
मुंबईतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल या समुद्रपुलाचा विचार केला तर हा आता पुढच्या महिन्यांमध्ये नागरिकांसाठी वाहतुकीस खुला होण्याची दाट शक्यता असून डिसेंबर महिन्यामध्ये हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून देखील तयारी वेगात सुरू आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा एक समुद्रावरील पूल असून त्याची लांबी 22 किलोमीटर इतकी आहे. 98% पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आलेले असून एकूण असलेल्या 22 किलोमीटर लांबी पैकी 16 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्रावर बांधण्यात आलेला आहे. साधारणपणे 25 डिसेंबर रोजी हा पूल प्रवाशांसाठी वाहतुकीस खुला होईल अशी शक्यता आहे.
तसेच हा पूल सुरू झाल्यानंतर मुंबई वरून नवी मुंबईला पोहोचणे खूप सुलभ होणार आहे. हा पूल वाहतुकीला जेव्हा सुरू होईल त्यानंतर मध्य मुंबईत असलेल्या सेवरी ते नवी मुंबईतील चिरले या दरम्यानचा प्रवास अवघा वीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
पुणे व लोणावळा खंडाळा ते मुंबई हा प्रवास 90 मिनिटात पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे. या पुलासाठी 18000 कोटीचा खर्च करण्यात आला असून हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल असून मुंबई ट्रांस हार्बर लिंक १६.५ किलोमीटर लांब डेक असलेला हा भारतातील पहिला पूल असणार आहे.