भाजपात वाजणार नाही बागुलांचे ‘बिगुल’; धरावी लागणारच स्व पक्षाची वाट
पुणे | पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी उमेदवारी मिळाली नसल्याच्या कारणास्तव काँग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त करत भाजपाची वाट धरण्याचा प्रयत्न केला . परंतु भारतीय जनता पक्षातील एकूण परिस्थिती पाहता आबा बागुल यांची भाजपात डाळ शिजणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही विश्वासनीय सूत्रांनी राष्ट्र संचारला दिलेल्या माहितीनुसार , आबा बागुल यांचे ‘ बिगुल ‘ भाजपामध्ये वाजू शकणार नाही त्याची महत्त्वाची काही कारणे आहेत. एकतर आबा बागुल ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात त्या पर्वती मतदारसंघात भाजपाकडे माधुरी मिसाळ , भीमा महाले यांच्यासारखे तगडे नेतृत्व आहे. त्यामुळे आबा बागुल यांचा कधीच विचार होऊ शकत नाही. बाबा मिसाळ हे सरचिटणीस होते त्या वेळेपासून त्यांनी हा मतदारसंघ भाजपासाठी पक्का बांधून घेतला. त्याकाळी सतीश मिसाळ हे मर्सिडीज घेऊन गोपीनाथ मुंडे यांना भेटायला गेले होते . त्यावेळी मुंडे साहेबांकडे साधी गाडी पण मिसाळांकडे मर्सिडीज होती. तेव्हापासून पक्षात त्यांचे वजन आहे . सुदैवाने माधुरी मिसाळ यांनी भाजपाशी एकनिष्ठ राहत आपली ही ताकद कायम ठेवली. राजकारणात लागणाऱ्या पैसा , धाकधडपशहा , पद , वरिष्ठ संबंध हे सर्वच समीकरण माधुरी मिसाळ यांनी जोपासले. त्यामुळे भाजपा या मतदारसंघाच्या संबंधी निर्णय घेताना त्यांचा सल्ला घेणार आणि आबा बागुल यांना माधुरी मिसाळ हे कधीच पसंती देणार नाहीत.
आबा बागुल यांना त्यांच्याच पक्षातून उभरते नेतृत्व असलेल्या अश्विनी कदम यांचे मोठे आव्हान आहे. स्टॅंडिंग चे अध्यक्ष असताना त्यांनी खूप चांगले काम केले. गेल्या काही वर्षात बागुल यांच्यापेक्षा त्यांचे प्रस्थ वाढत आहे आणि त्या लोकप्रिय नेत्या आहेत तसेच पक्षात असणारे सुभाष जगताप यांचे देखील बागुल यांचे फारसे पटत नाही. त्यामुळे कायम ‘ एकला चलो रे ‘ अशा भूमिकेत असणारे बागुल हे ‘ मर्यादित ‘ आणि संकुचित होत जाणारे नेतृत्व आहे याची जाण काँग्रेसमध्ये आहे.
बागुल यांनी फार मोठमोठे प्रोजेक्ट मांडले परंतु कागदोपत्री असणारे हे प्रकल्प प्रत्यक्षात कधीच साकारले नाहीत असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. त्यांचा एकही प्रकल्प आजपर्यंत यशस्वी झाला नाही. काही देणगीदार आणि प्रायोजकत्वाच्या माध्यमातून नऊ दिवसांचा नवरात्र महोत्सवाच्या पलीकडे त्यांच्या नेतृत्वाची भव्य दिव्यता कुठे जाणवत नाही.
नुकतेच काँग्रेस सोडू नये यासाठी बाळासाहेब थोरात यांनी त्यांची भेट घेतली आणि मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
परंतु कसबा आणि पर्वतीच्या अदलाबदल करून तेथे बागुल यांना संधी द्यावी ही त्यांची मागणी देखील काँग्रेसकडून मान्य होण्याची शक्यता नाही. महतप्रयासाने भाजपाकडून खेचून आणलेला कसबा मतदारसंघ आबा बागुल यांच्या हातात देऊन धोका पत्करण्याची शक्यता नसल्याचे काँग्रेस सूत्रानी सांगितले असल्याचे समजते.