पुणे ISIS प्रकरणात खळबळजनक माहिती समोर; दहशतवाद्यांकडून सोनाराच्या दुकानात झाली होती लूटमार
Pune ISIS Module : पुण्यातील दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी सोन्याचं दुकानं लुटल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी सोन्याच्या दुकानातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करून ती रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक माहिती एटीएसने केलेल्या तपासातून समोर आली आहे. मोहम्मद इमरान, मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या दहशतवाद्यांना 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती. गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणात सातत्याने नवीन अपडेट समोर येत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये एनआयएने इसिस मॉड्यूल प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी एनआयएकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी थेट सिरियामधून या दहशतवाद्यांना सूचना मिळत होत्या, असा दावा एनआयएने आपल्या आरोपत्रात केला होता.
केमिकल्ससाठी कोडवर्ड
तपासात याआधी अशी माहिती समोर आली होती की, अतिरेक्यांनी बॉम्बची निर्मिती करण्यासाठी काही कोडवर्ड तयार केले होते. या प्रकरणात आरोपींवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे. अतिरेक्यांनी जंगलात आपले प्रशिक्षण केंद्र उघडले होते. या प्रशिक्षण केंद्रात जवळील जंगलात बॉम्बस्फोटाच्या चाचणीची योजना आखत आयईडी स्फोटक बनवत होते. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी पुणे शहरामधील युवकांचं मन परिवर्तन करत होते.