पुणे तिथे काय उणे! मतदान करणाऱ्यांसाठी पेट्रोल डिलर्स असोसिएशनची अनोखी ऑफर
पुणे | देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील विदर्भातील दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटला आहे. पुण्यात १३ मे रोजी पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढवा यासाठी निवडणूक आयोगातर्फे विविध कार्यकम हाती घेतले जात आहे. अशातच मतदान वाढावे यासाठी पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने देखील ‘व्होट कर पुणेकर’ ही मोहीम हाती घेतली असून मतदान करणाऱ्यांना ५० रुपयांचे पेट्रोल फुकट दिले जाणार आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी माहिती देतांना संगितले की, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मतदार जागृतीसाठी उपक्रम हटी घेतले आहे. या प्रकारची मोहीम आम्ही देखील राबवावी असे आवाहन करण्यात आले होते. याला आम्ही प्रतिसाद दिला असून व्होट कार पुणेकर ही मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पुण्यातील पेट्रोल पंपचालक मतदान करणाऱ्या नागरिकांना बोटावरील शाई दाखविल्यानंतर एक लिटर ऑईल खरेदीवर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देणार आहे. आमची ही मोहीम २० मेपर्यंत सुरू असणार असल्याचे रुपारेल म्हणाले.
याचबरोबर असोसिएशनचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती व आवाहन करणार आहेत. मतदान वाढावे तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये आणि मतदान केंद्रापर्यंत योग्यरित्या जाता येईल यासाठी मदत देखील केली जाणार आहे. मतदानादिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना खाण्याचे आणि पाण्याच्या बाटल्यांचे देखील वितरण केले जाणार आहे.