पुण्यात पंतप्रधान मोदींसाठी खास एअर कंडिशन पगडी; जाणून घ्या या पगडीचे वैशिष्ट्य
पुणे | लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात पुणे, बारामती, माढा आणि सातारा या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान आज पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्य वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. जेव्हा जेव्हा मोदी पुण्यात येतात त्यावेळी त्यांच्यासाठी हटके अशी पगडी तयार केली जाते. त्या पगडीवर मराठी संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रेखाटन केलेलं असतं. यावेळी तयार करण्यात आलेल्या या खास पगडीला दिग्विजय योद्धा पगडी असं नाव देण्यात आले आहे.
कशी आहे दिग्विजय योद्धा पगडी ?
पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्यातर्फे ही पगडी तयार करून घेण्यात आलेली आहे. संपूर्ण कॉटनची, हाताने घडवलेली आहे. हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे पगडीवर आहेत. ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स, शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे. तसेच दिग्विज्याला साजेस सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे.
मोदींसाठी एअर कंडिशन पगडी
ही पगडी पूर्णपणे एअर कंडीशन पगडी आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही पगडी तयार केली आहे. पुण्यात सध्या प्रचंड प्रमाणात ऊन आहे. या ऊन्हात उष्णता जाणवू नये, यासाठी या पगडी एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे. एअर कंडिशन असल्याने ही पगडी वैशिष्ठपूर्ण आहे. आज मोदींच्या सभेपूर्वी भाजपच्या नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मोदींना प्रदान करण्यात येणार आहे.