ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

गावागावातील पारावर निवडणुकीच्याच गप्पा

आळेफाटा | आगामी लोकसभेच्या निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र याच लोकसभेच्या निवडणुकीचे सर्व पक्षीय राजकीय पडघम आतापासूनच “गाव गाड्यातील गप्पाच्या पारावर ” रंग धरु लागले आहे.मात्र यामध्ये कोण कोणाचा समर्थक व निष्ठावान कोण? यावरच जास्त गप्पा झडत आहेत. याबाबत अधिक समजलेली माहिती अशी की शिरुर लोकसभा मतदारसंघावर मागील दोन टर्म तरी शिवसेनेचे वर्चस्व खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या (Shivajirao Adhalarao Patil) माध्यामातून होते. मात्र गेल्या लोकसभेपासून आता सध्या तरी शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. याच शिरुर लोकसभा मतदारसंघातून डाॅ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी तीन वेळा विजयाची हॅटट्रिक नोंद केलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांचा दारुण पराभव केला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha) जुन्नर, शिरुर, खेड, भोसरी, हडपसर, आंबेगाव व हवेलीचा काही भाग आदी मतदारसंघ येतात. भोसरी वगळता इतरत्र राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत. मात्र आता राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहे, तीच अवस्था शिवसेनेची आहे आणि काँग्रेस तर फक्त नावापुरतीच राहिली आहे. त्यामुळेच शिरुर लोकसभा मतदारसंघावर आता नेमके कोणाचे वर्चस्व राहणार हाच प्रश्न सध्यातरी “गुल दस्त्यात” आहे. (Maharashtra Political News)

सध्या तरी शिरुर लोकसभा मतदारसंघ हा दोन राष्ट्रवादीच्या गटाच्या चर्चेतून रंगत आहे. शरदचंद्र पवार गटाने या मतदारसंघातून डाॅ. अमोल कोल्हे यांच्या रुपाने ‘तुतारी’च्या चिन्हाने उमेदवारी देऊन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. तर अजित पवार गटाच्या माध्यमातून आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची जरी चर्चा असली तरी, दिलीप वळसे पाटील मात्र इच्छुक नसल्याने सध्या तरी राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या गोटातून फक्त चर्चेच दिसून येत आहे. त्यामुळेच अजित पवारांना तगडा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने या मतदारसंघावर आपला दावा ठोकला असून, शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून तयार आहेत. पण हा मतदारसंघ नेमका कोणाच्या वाटेला जाणार? हा संभ्रम असल्याने त्यांचा देखील जीव टांगणीला लागला आहे. मात्र ते जर शिवसेनेकडून तिकिट नाही जरी मिळाले तरी, राष्ट्रवादीचे तिकिट घेऊन हा मतदारसंघ लढवणारच! अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे आणि त्याचा अंदाज सुध्दा घेत कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, असे समजत आहे. सकल मराठा संघाच्या माध्यमातून या प्रत्येक गावातून दोन मराठा या निवडणुकीत अर्ज दाखल करणार आहेत. ही सुध्दा सुप्त लाटेची चर्चा ऐन रंगात आली आहे. याच चर्चांच्या उधाणाचा सर्वपक्षीय संभाव्य उमेदवारांनी चांगलाच धसका घेतला आहे. हेही मात्र तितकेच खरे आहे. याच चर्चेने सध्या तरी गावातील पारावरचे “कट्टे ” चांगलेच रंगले आहेत. नेमका निष्ठावंत कोण? समर्थक कसा ओळखायचा ? हाच प्रश्न गाव कारभाऱ्यांना पडला आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात माळी आणि मराठा समाजाचे वर्चस्व जास्त आहे. कदाचित ही निवडणूक देखील जातीच्या फॅक्टर वर होणार काय ? असा सध्या तरी प्रश्न पडला आहे. तसेच इतर समाजाचे मतदार कोणत्या पक्षाला मतदान करणार..? हा देखील प्रश्न पडला आहे. तसेच भाजप या निवडणुकीत काय मोलाची भूमिका बजावणार ? हे देखील पाहणे गरजेच आहे. मात्र शिरुर लोकसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा बनवला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीचीच होणार..! यात तिळमात्र शंका नाही. पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे चालणार का ? की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीचा आवाज घुमणार ? हा मात्र आगामी लोकसभा निवडणुकीतच कळेल हे मात्र निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये