“लवकरच बेबी पेंग्विनला अटक होणार”, नितेश राणेंचा खळबळजनक दावा; ठाकरे कुटुंब डेहराडूनला रवाना
मुंबई | Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खळबळजनक दावा केला आहे. लवकरच बेबी पेंग्विनला अटक होणार आहे, असा दावा नितेश राणेंनी ट्विटद्वारे केला आहे. तसंच ठाकरे कुटुंब डेहराडूनला रवाना झाल्याचंही, राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मराठा आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली होती. यावरूनच नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, काल दुपारी एक वाजता ठाकरे कुटुंब डेहराडूनला रवाना झाले आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणासाठीची काळजी? मनोज जरांगेंचं उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आलं नाही का? असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
तसंच देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडला पक्षाच्या कामासाठी गेले होते. कोणत्याही कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
लवकरच बेबी पेंग्विनला अटक होण्याची शक्यत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे देश सोडून जाणार आहेत. सुशांत सिह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे हे पाऊल उचलणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे.