धक्कादायक! सायन रूग्णालयातील टॉयलेटमध्ये आढळला नवजात बालिकेचा मृतदेह
मुंबई | Mumbai News : मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील सायन रूग्णालयातील (Sion Hospital) टॉयलेटमध्ये एका नवजात बालिकेचा (Newborn Girl) मृतदेह आढळला. त्यामुळे रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. नवजात बालिकेला रूग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्यामध्ये फेकून दिल्यानं तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायन रूग्णालयातील टॉयलेटमधील कचऱ्यात नवजात बालिका आढळून आली. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तिची तपासणी केली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या बालिकेला मृत घोषित केलं. तर याप्रकरणी पोलिसांनी एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना 8 डिसेंबर रोजी घडली आहे. रूग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. त्यावेळी त्या सकाळी पावणे सातच्या सुमारात रूग्णालयातील टॉयलेटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना तेथे असलेली कचऱ्याची एक बादली खूप जड वाटली. त्यामुळे त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यांना एका काळ्या रंगाच्या पिशवीत नवजात बालिकेचा मृतदेह आढळला.
दरम्यान, या नवजात बालिकेचा घातपात कोणी केला का? आणि कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. तर आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.