राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचर

आली माझ्या घरी ही दिवाळी

दिप म्हणजे दिवा आणि अवली म्हणजेच ओळ. याचा संपूर्ण अर्थ पाहिला, तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. दिवाळी हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, खूप सारे फटाके आणि चविष्ट फराळ हे समीकरणच असते.
दिवाळीची सर्व तयारी झाली आणि आता सुरू झाले आहे उत्सव पर्व. जे वसुबारस, धनतेरस, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा आणि भाऊबीज असे पाच दिवस साजरे होते.

या दिवसांत घरात आणि घराबाहेर तेलाचे दिवे लावले जातात. उंचावर सुंदर असा आकाशकंदील लावून, घराबाहेर आकर्षक अशी रांगोळी काढून दिवाळीचे स्वागत केले जाते. प्राचीन काळी दीपावली हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक आहे अशी लोकांची धारणा होती. जी आजही आहे. त्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.

हा सोहळा समृद्धीचा, आनंदाचा मानला जातो.
दिवाळीची सुरुवात होते ती वसुबारसेने. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजेच द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आपल्याकडे याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे, सुख लाभावे, म्हणून ही पूजा केली जाते. त्यानंतर येणारा दिवाळीतला दिवस म्हणजे धनत्रयोदशी जिल्हा धनतेरस असेही म्हटले जाते.

या धनत्रयोदशी बद्दल एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्रमंथन केले. त्या वेळी त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणून या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. धन्वंतरी हे वैद्यराज असून, त्यांच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. अनेक वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर येते ती नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरक रूपी राक्षसाला मारून पापवासनांचा नायनाट करावा, असा एक विचार आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीरास तेलाचा अभ्यंग करून, सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंग स्नान.
त्यानंतर केले जाते ते लक्ष्मीचे पूजन. अाश्विन अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही चंचल असते. तिने स्थिर राहावे म्हणून या दिवशी तिचे पूजन करण्याचा प्रघात आहे.

लक्ष्मीपूजनानंतर दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणूनही ओळखतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवस म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. तर या मुहूर्तावर सोने किंवा अनेक मोठ्या वस्तूंची खरेदी केली जाते. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते.

अशा पद्धतीने पाडवा हा सण साजरा होतो. त्यानंतर येते ती भाऊबीज. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून त्याला यमद्वितीया नाव मिळाल्याचे मानले जाते. बहीण-भावामधले नाते दृढ करणारा हा सण आहे. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. अशी ही दिवाळी भारतातील विविध समाजांत उत्साहात साजरी केली जाते. तेलुगू, बंगाली, बौद्ध, तमीळ समाजातील लोक दिवाळीच्या दिवशी अनेक धार्मिक विधी करतात. महाराष्ट्रातील मराठी समाज मात्र लक्ष्मीपूजन साजरे करताे.

त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थ बनवणे, सणाचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या हक्कांच्या भेटी घेणे, रात्री फटाक्यांची आतषबाजी करणे, या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. दिवाळी ही अनेक अर्थाने समृद्ध असते. नात्यांना दृढ करते तसेच दिवाळीच्या दिवसात लहान मुले किल्ले बनवतात, आकाशकंदील बनवतात. किल्ल्यांचे रांगोळ्यांचे प्रदर्शनं आयोजित केले जातात. अशी ही कलात्मक दिवाळी.

तर विविध प्रकारचे विविध विषयांवरील लिखाण असलेले दिवाळी अंक याच दिवसांत प्रसिद्ध होतात. ती वाचकांसाठी आणि लेखकांसाठी खास पर्वणी ठरते अशी ही दिवाळी सर्वांनाच सुख-समृद्धी आणि आरोग्यमय जावो हीच शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये