भुजबळांकडे पेढे खायला अन् प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार; उद्धव ठाकरे असे का म्हणाले..
नागपूर : (Uddhav Thackeray On Praful Patel) उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. भुजबळांच्या घरी पेढे खाण्यासाठी जावं लागेल अन् त्यानंतर प्रफुल्ल पटेलांकडे जेवण्यासाठी जाऊ, असा टोला त्यांनी लगावला. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांना दिलासा दिला आहे. यावरुन ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय.
आजचा दिवस आनंदाचा आहे. आम्ही छगन भुजबळ यांच्याकडे पेढे खाण्यासाठी जाणार आहोत. ईडीने भुजबळांवरील चौकशी बंद केली आहे. त्यांना काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर. जामीनावर बाहेर आहात अशी दमदाटी केल्यानंतर आता भुजबळांनी काय चमत्कार केला हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत, असं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांनाही टोमणा मारला. आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या घरी जेवायला जाणार आहोत. पण, त्यांना विनंती करणार आहोत की मिर्ची कम जेवण द्या, असं म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली.
छगन भुजबळांना कोणती जडीबुटी मिळाली, कोणता बाबा मिळाला आणि चमत्कार झाला. त्यामुळे ईडी मागे गेली. मागे ईडीने तर म्हटलं की कशासाठी आरोप केले हे देखील माहिती नाही. त्यामुळे ही जडीबुडी सगळ्यांना दे अशी प्रार्थना मी देवाकडे करतो, असं ठाकरे म्हणाले.