३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला अन् अपात्र सरकारला निरोप; उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
मुंबई : (Uddhav Thackeray On Shinde Group) मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडले. अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी अपात्र आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वाचून दाखवाला. तसेच सरत्या वर्षात सरकारला निरोप देणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचे महत्व, अस्तित्व यावर मी दसरा मेळाव्यात बोललो होतो. देशातील लोकशाही, संविधान टिकणार की नाही यावर देशाचे लक्ष आहे. लोकसंख्येत भारत एक नंबरचा देश आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली असेल तर आपण सर्वजण, सर्वोच्च न्यायालय काय करत आहे? हा मोठा प्रश्न आह, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, लवाद सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणार आहे की नाही. हे लवाद सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न जुमानता आपल्या मस्तीने वागत राहीले तर जे हाल होतील ते कुणालाही सावरता येणार नाही.
काल न्यायालयाने नार्वेकरांना आदेश दिला आहे. काल नार्वेकर म्हणाले मी आदेश वाचला नाही म्हणून मी त्यांना आणि देशातील नागरिकांना हा आदेश वाचणार आहे. तसेच नार्वेकरांना देखील आदेशाची एक प्रत पाठवणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.