माय जर्नीसक्सेस स्टोरी

जिथे संघर्ष, तिथे यश…

सुरुवात कशी आणि कुठून करायची असे अनेक प्रश्न जरी मनात असले तरीही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधून त्यावर काम करीत राहणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. लढताना यश-अपयश, चढ-उतार येतच असतात. परंतु कुटुंबातील सदस्यांची सोबत आणि मेहनत करायची तयारी असेल तर आपण निवडलेल्या मार्गावर यशस्वी होतोच. अशाच पुण्यातील बावधन भागातील साक्षी दगडेपाटील या आहेत, ज्यांनी कमी वयात स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला सिद्ध केलं आहे. साक्षीचे आई-वडील उच्चशिक्षित असून त्यांनी आपल्या मुलीला कायम लढायला शिकवले आणि उद्योजिका बनण्यासाठी पाठिंबा दिला.

साक्षीने सुरुवातीला मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. याकामी आईने उत्तम मार्गदर्शन केले. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०२१ ला अल्पशा भांडवलातून व्यवसाय सुरू केला. दहावीपर्यंतचे शिक्षण रोझरी इंटरनॅशनल स्कूल, वारजे या ठिकाणी, तर महाविद्यालयीन शिक्षण अरिहंत काॅलेज, बावधन येथे त्या पूर्ण करीत आहेत. शिक्षण पूर्ण करीत असताना ५ मे २०२२ पासून त्यांनी स्वतःचं ज्वेलरी शॉप सुरू केले. याशिवाय इतर महिलांना ज्वेलरी विक्री करण्यासाठी प्रोत्साहित करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

त्यांना हँडीक्राफ्टमध्ये आवड असल्यामुळे त्यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या डिझाईनमधील मंगळसूत्र तयार करून विक्री करायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी निरनिराळ्या मशिनद्वारे ज्वेलरी तयार केली जाते. परंतु साक्षी या स्वतः डिझाईन करून आपल्या हाताने ज्वेलरी तयार करतात. ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे आपल्या सर्व वस्तू त्या महिला ग्राहकांना विक्री करतात. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मचा योग्य वापर त्यांनी केला आहे. साक्षी सांगतात की, महिलांना आकर्षित करणारी ज्वेलरी नवनवीन प्रकारात तयार करण्यात मला आनंद होतो.

अगदी १०० रुपयांपासून १०,००० रुपये किमतीपर्यंतची ज्वेलरी या माध्यमातून उपलब्ध असते. मी माझ्या कलेतून कमी पैशात, परंतु आकर्षक अशी ज्वेलरी तयार करते. मी केलेली हँडमेड ज्वेलरी महिलांना प्रचंड आवडत आहे. जिथे संघर्ष तिथे यश नक्कीच मिळते. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना व महिलांना इतकंच सांगेन मेहनत करीत राहा, या क्षेत्रात टिकण्यासाठी सतत नवीन डिझाईन आणि वस्तू तयार केल्या पाहिजेत. सातत्यपूर्ण स्पर्धेतून नक्कीच यशस्वी होऊ शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये