राष्ट्रसंचार कनेक्टलेख

वाद्यवृंद कलाकारांना वाली कोण ?

व्यावसायिक रंगभूमीवर अनेक वाद्यवृंदही सादर होतात. मात्र, वाद्यवृंद कलाकार नेहमी दुर्लक्षित राहिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ते जणू काही वाळीत टाकले गेल्यासारखे जगत होते. रंगभूमीवरच्या अनेक घटकांना मदत मिळाली होती, पण वाद्यवृंद रंगकर्मींना काहीही मदत मिळाली नाही. वाद्यवृंद सादर करताना प्रकाश योजना, रंगभूषा आणि इतर बाबींची गरज असते.रंगमंच कामगारांना रंगमंच कामगार संघटनेकडून अन्नधान्याची मदत मिळाली, पण बाकीच्यांचं काय? अशोक हांडे आणि प्रसाद महाडकर हे वाद्यवृंदक्षेत्रातले दोन दिग्गज. त्यांनीही या विधानाला दुजोरा दिला. अशोक हांडे म्हणाले, ‘६५ नाट्यनिर्माते असतील त्यातले २०-२५ ॲक्टिव्ह आहेत. वाद्यवृंद क्षेत्रात २५० हून अधिक निर्माते आहेत. त्यामध्ये लाखो लोक गुंतले आहेत. यात हॉटेलमधले वाद्यवृंद, लग्न-बारसं-वाढदिवस विवाह सोहळ्यात कला सादर करणारे वाद्यवृंद, बारमध्ये सादर होणारा वाद्यवृंद असे अनेक प्रकार आहेत. त्यात कीर्तनकार आहेत, जोगवा सादर करणारे कलाकार आहेत. कुठलंही काम संगीताशिवाय होत नाही. आनंद असो वा अन्य भावना, साजरीकरणासाठी वाद्यवृंद लागतोच.

मुंबईपुरतं बोलायचं तर आज दोन ते अडीच लाख कलाकार अडकलेले आहेत. आम्हालाच आश्‍चर्य वाटतं की ही मंडळी कुठे कुठे विखुरलेली आहेत. लग्न असो वा जागरण, गोंधळ असो वा तमाशा, संगीत बारी असो वा लोकनाट्य, मदारी असो वा नंदीबैल हे सर्व एक प्रकारे वाद्यवृंदच आहेत. यांना मदतीची घोषणा शासनाने केली असली तरी त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्व मिळून काही लाख कलाकार असतील. कारण गावागावात वाद्यवृंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात या सर्वांची अवस्था फारच वाईट होती. त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही.त्यांच्यापर्यंत कुणीही पोहचलं नाहीत.
‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर म्हणाले, नाट्य परिषद आणि तत्सम संस्थांना राजाश्रय आहे. वाद्यवृंद क्षेत्रातली मंडळी एकत्रित नाहीत. नाट्यसंस्था सरकारी मान्यताप्राप्त आहेत. आता आम्ही एकत्रित येण्याचा प्रयत्न करतोय. शंभर टक्के वाद्यवृंद कलाकार उपेक्षित आहोत. कुठल्याही कार्यक्रमात, मग तो शासकीय असला तरी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं घ्यावंच लागतं. अशा या कलाकारांना कोरोनाकाळात आणि त्यानंतरही कुणी विचारलं नाही, त्यांना काहीच पडलेली नाही. वादक कलाकार मानाने जगतात. कठिण काळात ते तसे जगलेसुद्धा. पण त्यांचीही परिस्थिती बिकट आहे.

वाद्यवृंद कलाकारांपैकी ०.२ टक्के कलाकार वाहिन्यांच्या कार्यक्रमात वाजवताना दिसतात पण इतर वादकांचं काय? शुक्रवार ते रविवारदरम्यान होणार्‍या कार्यक्रमांमुळे तरी त्यांचा आठवडा नीट जात होता. लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह बंद असल्यामुळे त्यांना उपासमारीला तोंड द्यावं लागलं होतं. या काळात आम्ही काही ऑनलाईन कार्यक्रम करायचो पण त्यालासुद्धा आता परवानगी दिली जात नाही. अशोक हांडे यांची स्वतःची ‘चौरंग’ ही संस्था आहे. त्यांचं एक कुटुंब आहे. अशा कुटुंबातल्या मंडळींना त्यांनी लॉकडाऊनच्या काळात अर्धा का होईना, पगार दिला. त्याबद्दल अशोक हांडे म्हणाले, ‘नाटकवाल्यांपेक्षाही वाद्यवृंद कलाकारांची अवस्था वाईट आहे. नाटकवाल्यांना मालिका तरी आहेत, रंगमंच कामगारांना त्यांच्या संघटनेकडून मदत मिळते पण वाद्यवृंद कलाकार मात्र अडचणीत आले आहेत. नाट्य परिषद म्हणते की हे नाट्य कलाकार नाहीत, त्यामुळे त्यांना मदत मिळणार नाही. त्यांना तुम्ही सभासद बनवून घेतलं आणि आता मात्र त्यांनी वार्‍यावर सोडलं. कलाकार संघटना त्यांना सभासद करून घेत नाहीत कारण नाट्य परिषदच्या घटनेत तशी परवानगी नाही, मग नाट्य संकुल उभारण्यासाठी वाद्यवृंद कलाकारांकडून पैसे कसे घेतले? आम्ही ना तिकडचे ना इकडचे.

या वाद्यवृंद कलाकारांनी अनेक कारणांपोटी अनेक वेळा कार्यक्रम सादर करून निधी जमवून दिला आहे. त्यावर भाष्य करताना प्रसाद महाडकर म्हणाले, ‘महाराष्ट्रावर संकट कोसळलं, देशावर एखादी आपत्ती आली की याच कलाकारांनी कुठलंही मानधन न घेता कार्यक्रम सादर केले आणि आज तेच कलाकार रस्त्यावर आले. हे कलाकार कुणाकडे भीक मागणारे नाहीत, तर मानाने काम करणारे आहेत. मात्र त्यांच्या पाठीशी कोणीच नाही. भूकंप झाला किंवा कुठलीही आपत्ती आली की या वाद्यवृंद कलाकारांच्या मदतीने पाच ते सहा लाख रुपयांचा निधी उभा केला जातो आणि अलिकडच्या काळात त्यांच्याकडेच पाठ फिरवली गेली, ही शोकांतिका आहे. आमच्याबरोबर जाहिरात डिझाईन करणारे आर्टिस्ट, नेपथ्यकार, साऊंड सिस्टिम पुरवणारे, तालीम हॉलवाले, वादक कलाकार, प्रकाश योजनाकार असे सात ते आठ उद्योग आहेत, याची जाणीव कुणालाच नाही.

रंगकर्मींच्या प्रातिनिधीक भावना!
लॉकडाऊनच्या वातावरणात रंगकर्मी कोरोनाचा विचार करताना दिसत होते. नाट्यगृहं बंद होती. नाटकांचे प्रयोग होत नव्हते. त्यामुळे मानधन मिळत नव्हतं. खर्च आ वासून उभा होता. राज्य नाट्य स्पर्धा कधी होणार माहिती नव्हतं. हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वच मंडळी नाट्यव्यसाय कधी सुरु होतोय याची वाट पाहताना दिसत होते. असाच एक रंगकर्मी प्रशांत विचारे. तो भरत जाधव आणि कंपनीमध्ये रुळला आणि नाव झालं. भरत जाधव यांनी ‘मोरूची मावशी’ पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर आणलं, त्याचं दिग्दर्शन प्रशांत विचारे यांनी केलं होतं. ‘सही रे सही’ या नाटकात त्याने लक्षवेधी भूमिका सादर करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो म्हणतो, एका समंजस विषाणूच्या विळख्यात संपूर्ण महाराष्ट्र अडकला. समंजस यासाठी म्हणायचं कारण त्याला कुठे असावं आणि कुठे नसावं हे कळत होतं. तो कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणत शक्तिशाली होत होता. तो इतका शक्तिशाली बनला की तोच राज्य व्यवस्था चालवतोय का काय, असा प्रश्‍न पडला.

दुपारी १ ते ४ दरम्यान तो शांत असायचा. दुपारी चारनंतर ॲक्टिव्ह व्हायचा. तुम्ही बेस्ट बसेस किंवा शेअर रिक्षाने प्रवास करा, तो शांत. पण लोकलने प्रवास केलात तर ॲक्टिव्ह. तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असाल तर तो शांत पण सामान्य जनता असाल तर तो ॲक्टिव्ह. मोर्चे-आंदोलनं-सभा-पत्रकार परिषदा-लोकार्पण सोहळे असतील तर तो शांत, पण जिथे सॅनिटाइज करून, ऑक्सिजन पातळी तपासून, तुमचं तापमान तपासून, सामाजिक अंतर म्हणून एक जागा सोडून बसवलं जायचं त्या नाट्यगृहात आणि सिनेमागृहात मात्र हा ॲक्टिव्ह असायचा. आता त्याच्यासोबत जगायची सवय होतेय. त्याचा संसर्ग झाला की ऑक्सिजन पातळी कमी होते आणि श्‍वास घेणं अशक्य होतं. कलाकारांचं अलिकडच्या काळात तेच झालं. नाट्यगृह-सिनेमागृह बंद करून आमचा श्‍वासच बंद झाला. प्रशांतच्या या मनोगतातून रंगकर्मींच्या प्रातिनिधीक भावना प्रकट झाल्या. ‘नाट्यसंपदा’ या संस्थेचे ज्येष्ठ निर्माते अनंत पणशीकर आपलं वैयक्तिक मतं मांडताना म्हणाले, ‘सध्या तरी रंगभूमीवरील सर्व घटकांना जगवणं आणि मागील दोन वर्षांमध्ये झालेलं नुकसान भरुन काढणं महत्वाचं आहे.

कारण हा प्रश्‍न आता लॉकडाऊनपुरता मर्यादित नाही. नाट्य व्यवसाय सुरळीत व्हायला २०२३ उजाडावा लागणार आहे. सर्व मदार सरकारी मदतीवरच आहे. सरकारने एक नोडल अधिकारी नेमून महाराष्ट्रातल्या रंगकर्मीयांच्या विविध संस्थांकडून कार्यरत असलेल्या रंगकर्मींची माहिती गोळा करावी आणि पुढील काही काळ दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत तसंच अन्नधान्याची तरतूद करावी. ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अजित भुरे यांनी अशी समस्या पुन्हा उद्भवल्यास दोन टप्प्यांमध्ये मदतीचा विचार करावा, असं मत मांडलं. पहिल्या टप्प्यात प्रेक्षक नाट्यगृहामध्ये पूर्वीसारखे येऊ लागल्यानंतर कलाकारांनी कमी मानधनात नाटकांचे प्रयोग करून रंगमंच कामगारांना संपूर्ण मानधन कसं मिळेल हे पहावं. दुसर्‍या टप्प्यात टेलिव्हीजन किंवा इतर माध्यमात व्यस्त असलेल्या कलाकारांनी रंगमंच कामगारांना आपापल्या युनिटमध्ये सामावून घेण्याचा तसंच तिथल्या सहाय्यकांना मेक अप, कला दिग्दर्शन इत्यादी विभागात कामं मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

धरसोडीचा फटका-

एक दोन दिवस निर्बंध शिथिल होणार, मुख्यमंत्री त्यावर सही करणार आणि त्यानंतर नवे नियम जाहीर होणार अशा बातम्या कोरोनाकाळात अनेकदा आल्या. नव्या निर्बंधांमध्ये नाट्यगृह सुरु होऊन ५० टक्के आसनक्षमतेने नाट्यप्रयोगांना परवानगी दिली जाणार, असं नाट्यसृष्टीत बोललं जातं होतं. रंगकर्मी खुशीत होता. मात्र नाट्यगृह सुरु होऊनसुद्धा निर्माते मंडळी नाटकं सादर करणार नाहीत, याची धास्ती होती. याचाच अर्थ असा की नाट्यगृहं सुरु होऊनही पटकन काम मिळालं नाही. नाट्यगृहात १०० टक्के प्रेक्षकसंख्या येण्यासाठी आणखी काही महिने निश्चितच थांबावं लागणार होतं. जेष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी आपल्या ‘अनन्या’ या नाटकाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, मागचा लॉकडाऊन उठला आणि आम्ही वर्षभराने ‘अनन्या’चा प्रयोग केला. त्यासाठी रंगीत तालमीपासून जवळपास दीड लाख रुपयांचा खर्च केला आणि प्रयोग संपताच पुन्हा लॉकडाऊनची बातमी आली.

नुकसान निर्मात्याचं झालं. आम्ही भले ५० टक्के मानधनावर काम केलं पण प्रेक्षकांचं येणं गृहीत धरता येत नाही. खरं तर कोणीही प्रयोग करण्याच्या मनस्थितीत नव्हतं. हे सारं घडलं केवळ सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे. शीतल तळपदे हे व्यावसायिक रंगभूमीवरचे ज्येष्ठ प्रकाश योजनाकार. आजपर्यंत त्यांनी अनेक नाटकांची प्रकाश योजना केली. अनेक कामगारांना त्यांनी प्रकाश योजनेचं ट्रेनिंग देत घडवलंय. एक वेगळाच मुद्दा मांडताना ते म्हणाले, गेली दीड-दोन वर्षं नाट्यसृष्टीही बंद होती. बरीचशी तंत्रज्ञ आणि कामगार मंडळी नाट्य व्यवसाय सोडून बेभरवशाला कंटाळून दुसर्‍या ठिकाणी गेली. त्यामुळे नाट्य व्यवसायात मोठी पोकळी निर्माण होईल, हे लक्षात घ्यायला हवं. व्यवसाय पुन्हा सुरु झाला तेव्हा ५० टक्के प्रेक्षक आले तरी संस्थांकडे कुशल कामगार असतील का, हा प्रश्‍नच होता.

आपल्या रंगभूमीसारखे कुशल कामगार जगात कुठे मिळतील, याबद्दल शंका बाळगावी अशी परिस्थिती होती. आपण पाच ते सहा तासात अख्खं नाटक उभं करतो आणि सेट हा काढतो. तसंच ब्लॅक आऊटमध्ये रंगमंचावरील प्रॉपर्टी बदलतो, सेट बदलतो. हे कुठल्याही प्रकारे अनस्किल्ड लेबर नाहीत. त्या कामगाराने कुठलंही प्रशिक्षण न घेता एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हा वारसा गेला आहे. हे लोक या बेभरवशाच्या व्यवसायाला कंटाळून गेले; तर परत येतील का? ते परत न आल्यास होणारं नुकसान रंगभूमीचंच असेल. काही लोकांना मदत अपुरी पडत होती तर काहींना मदत नको असेल म्हणून सोडून गेले तर दोष कोणाचा? फक्त कोरोनाचा? आता त्यांच्या जागी दुसरे कोणी आले तर आम्ही बोंबाबोंब करायची का?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये