संडे फिचररिअलिटी चेक

काम आणि दाम

worth of work and law

संभाजी येवले नामक गावातील एक ऊसतोड मजूर कारखाना संपवून गावाकडे आला. तब्बल साडेचार महिन्यांनी तो गावात आला होता. त्याला एकाने विचारले किती केली कमाई, तर हसत म्हणाला तीस हजार रुपये. कोरोना काळात एक चप्पल शिवत आणि बूट पॉलिश करणारा परिचित कोरोना गेल्यावर भेटला त्यावेळी त्याला विचारले, काय केले लॉकडाऊनमध्ये. त्याच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाला फक्त जिवंत राहिलो. केवळ दोन वेळच्या जेवणावर दिवसभर काम करणारे कामगार आपल्या आसपास असतात. हे कसे जगतात? यांचे कसे भागते? यांना स्वप्न पडत असतील का? काय असतील यांची स्वप्नं?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील काही कामगार गायरान जमिनी त्यांना मिळाव्यात म्हणून केस दाखल करायला माझ्याकडे आले होते. त्यानंतर प्रत्येकवेळी भेटायला ते सगळे येत असत, म्हणून आम्ही त्यांचेपैकी एक प्रतिनिधी पाठवत जा उगीच कामधंदा सोडून सगळे येत बसू नका सांगितल्यावर, पुढील तारखेला एक अपंग माणूस तारखेला आला. माझ्याकडे यायला त्याला उशीर झाला होता, तोपर्यंत तो बसून होता. दुपारी लंच ब्रेक झाल्यावर मी त्याला भेटलो आणि उशीर का केला विचारले तर म्हणाला गावातून पहाटची अजाण झाली की, निघालो, गेवराईत यायला उशीर झाला आणि सकाळची गाडी गेली.

मी त्याला विचारले, तुम्ही इतक्या सकाळी निघूनपण गाडीपर्यंत का नाही पोहोचू शकले, तर म्हणाला चालत आलो होतो. चालत का असे विचारल्यावर म्हणे, गावातून गेवराईला यायला जे पैसे लागतात त्यातून मिसळ खाऊन होते, जेवणाचा प्रश्न मिटतो. त्याचे अपंगत्व पाहून, पण तुम्ही का आले? दुसर्‍याला कुणाला पाठवायचे असे म्हणल्यावर म्हणे मला वन फोर्थ आहे, तिकीट कमी लागते म्हणून आलो. आता उशीर झाला आहे, आज इथेच थांबा, रात्री केसवर काम करू म्हणाल्यावर, जरा चलबिचल करीत म्हणाला, सर, रात्री थांबायला नाही जमायचं. मी आणि माझी बायको रोज रात्री गोधडी शिवतो, त्याचे आम्हाला दीडशे रुपये मिळतात. ते काम बुडाले तर रोज नाही मिळणार. त्यांच्या दोघांची पूर्ण रात्रीची कमाई दीडशे रुपये होती.

शेतात कामावर येणार्‍या महिला दिवसभर शंभर-दोनशे रुपयांत काम करतात. महिलांना पुरुषांच्या तुलनेत आजही कमी रोजगार दिला जातो. महिला पुरुषांच्या तुलनेत कमी काम करतात याबाबत कुठलाही वैज्ञानिक पुरावा नसताना आजही हे राजरोस चालते. सफाई कामगार, मैला उचलणारे कामगार, नाल्यात उतरून, गटारात उतरून काम करणारे कामगार हे कायम दुर्लक्षित घटक आहेत. त्यांना मानवी हक्क आहेत हे आपण विसरलो आहोत की आपण मुद्दाम त्याकडे दुर्लक्ष करत आहोत हे प्रश्न माणूस म्हणून आपण आपल्याला विचारायला हवेत. मुळात आपण त्यांना माणूस तरी मानतो की नाही हाच प्रश्न आहे. कारण ते त्यांचेच काम आहे अशा भावनेत त्यांचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात.

भारतीय संविधानाच्या आर्टिकल ३९ (ड) मध्ये दोन खूप महत्त्वाच्या तरतुदी आहेत. पुरुष व स्त्रिया यांना समान कामाबद्दल समान वेतन आणि स्त्री व पुरुष कामगाराचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय आणि ताकद यास न पेलणार्‍या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये. कामगार कायद्यातील तरतुदीनुसार भारतातील कामगारांकडून आठ तासापेक्षा जास्त काम करून घेऊ नये असे स्पष्ट केलेले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे भरपूर निर्णय झालेले आहेत. कामगारांना कमीत कमी किती रोज असावा याबाबत देखील आपल्याकडे कायदे आहेत. असे कागदोपत्री आपण सक्षम आहोत. आपण फक्त त्याचा अवलंब करत नाहीत.

आपल्याकडे संघटित, असंघटित, कायम स्थलांतरित, हंगामी स्थलांतरित प्रकारचे कामगार आहेत. काही लोक बाहेर राज्यात जातात आणि तिकडे काम शोधतात. त्यांना माहीत नसते त्यांना तिकडे काय काम मिळेल किंवा मिळेल की नाही. तर हंगामी स्वरूपाचे कामगार म्हणजे ऊसतोड मजूर किंवा अशीच शेतीची कामे करायला मर्यादित काळापुरते आणि वर्षाच्या ठरावीक कालखंडात येणारे मजूर असतात. अशा मजुरांना किती रोज मिळेल, त्यांनी किती तास काम करावे, कामाचे स्वरूप काय असेल अशा गोष्टीचे काही देणे घेणे नसते. त्यांना पोटाची भूक भागेल एवढी माफक अपेक्षा ठेवून हे लोक कामासाठी धडपड करत असतात.

भारत हा कृषिप्रधान देश आहे असे म्हटले जाते, परंतु शेतीतील काम करणार्‍या मजुराला संरक्षण देणारा एकही कायदा अथवा कायदेशीर तरतूद कायद्यात नाही ही वस्तुस्थिती आहे. डॉ. निशिकांत वारभुवन हे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात रिसर्चचे काम करतात. त्यांनी केंद्र शासनाला उसतोड मजुरांच्या समस्येबाबत एक अहवाल सादर करून त्याबाबत काही अमल सुचवले आहेत. ऊसतोड मजुराला कुठलेही विम्याचे, त्यांच्या कामाचे, त्यांच्या पैशाचे सौरक्षण लिखित स्वरुपात नाही. त्यांनी किती तास काम करावे याबाबत काहीही नियम नाहीत. ऊसतोड मजुराबाबत अभ्यास करणार्‍या एका संस्थेच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिलेचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गर्भपात हे उसाची मोळी उचलण्याने होत आहेत.

ऊसतोड मजुराची जोड (पती-पत्नी) बनवण्यास कित्येकदा मनाविरुद्ध बालविवाह केले जातात हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी लागणार्‍या प्राथमिक सुविधादेखील पुरवल्या जात नाहीत. महिलांवर होणारे अत्याचार तर अजून वेगळीच समस्या आहे. घेतलेली उचल फेडू न शकल्यामुळे कामगारावर होणारे अत्याचार अजूनही कामगार निमूटपणे सहन करत आहेत. हे सगळे आजच नाही घडत. तर गेली कित्येक वर्षे रोज घडत आहे. यात बदल जर काही घडत असेल तर तो एवढाच की, अत्याचार वाढत आहे बस. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तगली नसून दलित व कामगारांच्या हातावर तगलेली आहे हे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे वाक्य हे कामगारांचे वर्णन करणारे अंतिम सत्य आहे.

आजही आपण दुर्लक्षित असलेल्या कामगारावरच अवलंबून आहोत ही वस्तुस्थिती आहे. आपल्या आसपास स्वच्छता ठेवणारा कामगार स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून आपला परिसर चांगला ठेवतो, पण आपण त्यांच्याकडे कायम ते त्यांचे कामच आहे या भावनेतून पाहतो हे चूक आहे. आता या देशातील कामगारांच्या मानवी हक्कावर काहीतरी भरीव काम झाले पाहिजे असे मला वाटते.

_अ‍ॅड. महेश भोसले

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये