भटकंती आडवाटेचीसंडे फिचर

कोकणातील जांभ्याच्या सड्यांवरील खोदचित्रे

हिरवी झाडी अन् तांबडी माती, रुपेरी दर्या अन् चंदेरी वाळू ही कोकणची ओळख बनली आहे. पण डहाणूपासून सावंतवाडी पल्याडच्या गोव्यासह कारवारपर्यंत मराठी कोकण पसरलं आहे. पश्चिमेचा सिंधुसागर आणि पूर्वेचा बलदंड सह्याद्री यांच्या सापटीत सापडलेली ही तुलनेनं अरुंद अशी कोकणपट्टी अपरांत म्हणूनही ओळखली जाते.

दीर्घ अशा भूशास्त्रीय आणि वातावरणीय प्रभावांमुळे इथे जांभ्या दगडाचे विस्तीर्ण सडे निर्माण झाले आहेत. त्यांना लॅटेराइट प्लॅट म्हणून ओळखले जाते. या फारसं काही उगवू न शकणार्‍या सड्यांवर एक जगावेगळी अद्भुत करामत पाहायला मिळते. त्याला म्हणायचं, खोदचित्रे किंवा पेटोग्लिफ्स! काही मंडळी यांना कातळशिल्पे म्हणू लागली आहेत; परंतु ती पूर्णपणे चुकीची गोष्ट ठरते. कातळ म्हणजे काळा फत्तर किंवा बेसॉल्ट आणि शिल्प हे त्रिमिती असते. फक्त लांबीरुंदी असणारी ही जांभ्याच्या सड्यावरील खोदून काढलेली चित्रे म्हणूनच त्यांना म्हणायचं खोदचित्रे. कारण इथे कातळही नाही आणि त्या प्राचीन मानवाने निर्माण केलेल्या आकृती त्रिमितीमध्येही नाहीत.

१५ ते ५० हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन मानवाने कोकणातील सड्यांवर अनेक ठिकाणी विविध खोदचित्रे निर्माण केली आहेत. आजवर त्यांचा व्यवस्थित शोध, अभ्यास व नोंदीकरण केलेले नव्हते. पण गेल्या १५-२० वर्षांत अनेक अभ्यासकांचे तिकडे लक्ष वेधले गेले आहे. विशेषत: रत्नागिरीमधील सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई यांनी अशा खोदचित्रांचा शोध मोठ्या प्रमाणावर घेतला आहे. आता या खोदचित्रांचे अधिक संशोधन, संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आहे.

मध्य प्रदेशातील भीमबेटका येथेही अनेक शिलाश्रयांमध्ये आदिमानवाने काही चित्रे रेखाटली आहेत. त्यांनाही खूप महत्त्व आहे. ती सर्व चित्रे उभ्या कातळांवर असून, ती लाल पांढर्‍या रेघांनी रेखाटलेली आहेत. कोकणातील जांभ्याच्या सड्यांवर मात्र ही जमिनीवर, म्हणजे आडव्या प्रतलावर खोदून तयार केलेली चित्रे आहेत. काही ठिकाणी ही संख्येने बरीच, तर काही जागी ती सुटी, एकेकटी आहेत. काही खोदचित्रांभोवती चित्र चौकटीही खोदलेल्या आढळतात.

या खोदचित्रांमध्ये भौमितिक नक्षी, वर्तुळे, मासे, पक्षी, प्राणी, मानवाकृती असे वैविध्यही आढळते. यातील काही वैशिष्ठ्यपूर्ण खोदचित्रांबद्दल थोडक्यात, पण महत्त्वाची माहिती पर्यटनासाठी रोजगाराभिमुख क्षेत्रांसाठी जनसामान्यांसमोर येण्याची नितांत आवश्यकता आहे. काही खोदचित्रे अगदी रस्त्याच्या कडेला, गावांजवळ, सरकारी किंवा खासगी जमिनीत आहेत. त्यांच्या जमिनीवरील मालकी हक्कात बदल न करता त्यांचे संरक्षण केले जायला हवे.

कोकणातील जांभ्या दगडाच्या चिर्‍यांची बांधकामासाठी मागणी सतत वाढती आहे. त्यासाठी नवनव्या चिरेखाणी निर्माण होत आहेत. आंबा, काजूसारख्या फळबागायतीची लागवडही अशा सड्यांवर होऊ लागली आहे. रस्ते, घरे, फार्म हाऊसेस, कारखाने आदी गोष्टीही अशा सड्यांवर निर्माण करताना, तेथील प्राचीन, अनमोल अशा खोदचित्रांकडे दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच अशी खोदचित्रे राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा देऊन जतन व्हायला हवीत. विशेष महत्त्वाची खोदचित्रस्थाने लोकांना परिचित व्हावीत, त्यांना तिथवर जाणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांचे नकाशांकन आणि तेथे पोहोचण्यास रस्तेनिर्मिती, तसेच त्या रस्त्यांवर मार्गदर्शक फलक लावणे आणि स्थानिकांना त्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे गरजेचे आहे.

बारसूच्या सड्यावरील अद्भुत खोदचित्र
राजापूरजवळच्या देवाचे गोठणे गावाजवळ बारसू नावाच्या वस्तीशेजारील सड्यावर १७ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशी चित्र चौकट आहे. त्यामध्ये दोन वाघ एकमेकांकडे तोंड केलेले दाखविले आहेत. त्या दोन व्याघ्राकृतींदरम्यान एक मानवी आकृतीही खोदलेली आहे. वाघांची शेपूट बिनगोंड्याची असून, त्यांच्या अंगावर पट्टेही दाखविलेले आहेत. जबडा, त्यातील दात-जीभ सारे काही नीट दिसते. काहीजणांच्या मते लांबीच्या विरुद्ध बाजूने पाहिले असता समुद्रातील लाटा व त्यात तरंगणारी बोट असे भासते.

देवाचे गोठणेच्या सड्यावरील चुंबकीय विस्थापन असणारे खोदचित्र
एकेकाळी ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांच्या वास्तव्याने प्रसिद्ध असणार्‍या देवाचे गोठणे गावाच्या वरच्या बाजूकडे जाणार्‍या पाखाडीने चालत गेले की, मोठा सडा दृष्टीस पडतो. या सड्यावर एका चित्र चौकटीत एक मानवाकृती खोदून काढली आहे. त्या आकृतीत गोल आकाराचे डोके, धड/शरीर, हात व पाय दाखविले आहेत. कान-नाक-डोळे-मुख आदी गोष्टी कोरलेल्या नाहीत.
आपण आपले होकायंत्र किंवा चुंबकसूची त्या मानवी आकारावर ठेवली तर भलतीकडेच उत्तर दिशा दाखवते. मात्र चित्रचौकटीबाहेर तेच होकायंत्र किंवा चुंबकसूची योग्य दिशेलाच उत्तर दिशा दर्शविते. अश्मयुगीन मानवाला चुंबकीय गुणधर्म माहिती असणे शक्यच नव्हते. चुंबकीय क्षेत्र ठरविण्याची कोणतीही साधने त्यावेळी अस्तित्वात नव्हती. अशा वेळी त्या आदिमानवाने ही चित्रचौकट नेमकी चुंबकीय गुणधर्म दाखविणार्‍या भूक्षेत्रावरच कशी निर्माण केली असेल, याचा सुगावा लागत नाही.

उक्षी येथील हत्तीची पूर्णाकृती
उक्षी गावातील सड्यावर सुमारे ६ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद अशी भव्य गजाकृती जमिनीवर खोदून काढलेली आहे. त्याची सोंड, सुळे, गंडस्थळे, भव्य शरीर, पाय, शेपूट हे सारे अगदी प्रमाणबद्ध आहे. म्हणजे त्या काळात खोदचित्रकारांना हत्तीचा पूर्ण परिचय असावा. असे हत्ती त्या परिसरातच वावरत असावेत. त्यांचा योग्य असा अधिवासही येथे असला पाहिजे.

इतरही अनेक खोदचित्रे
कोकणात आता न आढळणारा गेंडा, त्याचप्रमाणे हरीण, डुक्कर, मासे, कासव इतर काही जलचर यांचीही खोदचित्रे वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. काही इलेक्ट्रॉनिक सर्किटशी साधर्म्य असणारे मोठमोठे पटही काही ठिकाणी चित्र चौकटीत साकारलेले दिसतात. ते कशाचे चित्रण? याचा उलगडा होत नाही.
कोकणचा हा आजवर उपेक्षित राहिलेला, अपरिचित वारसा लोकांपुढे येण्यासाठी खूप प्रसिद्धी व प्रयत्नांची गरज आहे. कोकण पर्यटनात महत्त्वाची भूमिका ही खोदचित्रे बजावू शकतील. पुरातत्त्व विभाग-वनखाते-पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या एकत्रित सहभागातून देवभूमी कोकणात एक नवा पैलू लोकांसमोर आणला जाणे गरजेचे आहे.

_प्र. के. घाणेकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये