पुस्तक जगतातसंडे फिचर

समीक्षेतील अवतरणे

समीक्षेतील अवतरणे हा प्राध्यापक रा. ग. जाधव यांचा समीक्षात्मक लेखांचा संग्रह. या संग्रहामध्ये एकूण चौदा प्रकरणे आहेत. ललित निबंधातील जुने आणि नवे विचार, लेखन इथपासून समीक्षेला सुरुवात होते ती अखेरच्या प्रकरणापर्यंत म्हणजे समीक्षा व समीक्षक यांच्यापर्यंत येऊन थांबते.

समीक्षा आणि समीक्षक म्हणजे काय या प्रश्नापर्यंत ते येतात आणि त्याचे उत्तरही सहज देऊन जातात. ललित कलांच्या सर्व क्षेत्रांमध्ये समीक्षा आणि समीक्षक यांची नैसर्गिक गरज असते. समीक्षक हा कलाकृती आणि रसिक यांना जोडणारा सेतू असतो. त्यामुळे समीक्षक आवश्यकच असतो. या विचारापर्यंत ते येऊन थांबतात. समीक्षकाच्या लेखनाने मनोरंजन, प्रबोधन, आनंद याचा अनुभव समृद्ध होतो. वाचकांच्यासाठी अनुभवाची चिकित्सा करून तो अधिक यथार्थ, समृद्ध आणि सुस्पष्ट करण्याचं काम समीक्षक करीत असतो. म्हणूनच चांगल्या साहित्याला चांगल्या समीक्षकाची तहान असते आणि चांगल्या समीक्षेला चांगल्या साहित्याची भूक असते. समाजाच्या वाङ्मयीन इतिहासाच्या परंपरेत म्हणून या तहानभुकेचे एक जैविक नाते निसर्गतः असते. समीक्षक नेहमी त्रुटी काढतो, कमतरता दाखवतो, ती टीकात्मक पद्धतीनेच असते आणि लेखकाच्या व्यंगावर तो लिहीत असतो, एवढा संकुचित अर्थ समीक्षकांचा नाही. यामध्येच रा.ग. जाधव यांची प्राध्यापक गो. म. कुलकर्णी आणि डॉक्टर वसंतराव जोशी यांनी मुलाखत घेतली आहे. ती या पुस्तकात आहे.

जाधव यांच्या १९६० ते ७० या दशकातल्या लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. १९७१ रोजी तेव्हा येथे विश्वकोशात रुजू झाले. त्यापूर्वी एलफिस्टन कॉलेज आणि मिलिंद महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करीत होते. समीक्षक म्हणून त्यांच्या जडणघडणीचा हा काळ असला तरी त्यांच्याच शब्दात विश्वकोशात ज्ञान कला क्षेत्राच्या नुसत्या बाह्य दर्शनानेच अवाक झालो. नम्र झालो. जगण्याचे, निर्मितीचे, संस्कृतीचे सगळे कृतक दंभ कोसळून पडले. क्षुद्रतेची श्रीमंत जाणीव आली. विश्वकोशाचे विश्व ज्याने एकदा पाहिले तो कसल्याच जगण्यालेखनाने समाधानी राहणार नाही.

या समाधानाच्या ओढीने त्यांनी साहित्यक्षेत्रात वाटचाल केली. त्याच वेळी त्यांनी आपली ज्ञानलालसाही पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. समीक्षेतील अवतरणे यात त्यांचे काही विचार आहेत त्या काळातले. छोटेखानी. परंतु तुकाराम महाराजांच्या तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाचि वाद आपणासी या ओळीवर ते संवादात्मक लेखन करतात. तो त्याच्या पुस्तकाचा पाया आहे. यात ते विविध अभंगांचे दाखले देतात. समीक्षक समीक्षेतील अवतरणे का देतो? त्याचे संदर्भ काय आहेत? त्याची आवश्यकता कशी असते? यावर ते मत मांडतात. खरेतर ललित साहित्य यासंदर्भात समीक्षेच्या अंगाने फार मोठे लेखन झालेले नाही.

मुळात ललित साहित्याकडे ज्या संवेदनशील दृष्टीने पाहणे आवश्यक असते. मग त्याची समीक्षा करणे महत्त्वाचे ठरते. मराठी वाङ्मय यामध्ये अशा प्रकारची समीक्षा अपवादात्मक आहे. मुळात मराठी भाषेमध्ये दर्जेदार समीक्षेचे सातत्याने नवे विचार आणि लेखन पहायला मिळत नाही. त्याची कारणे मला वाटते आपल्या वाचन संस्कारात असावीत. हलके-फुलके, सहज समजेल असे वाचन करण्याकडे वाचकांचा ओढा असतो. यात चूक नाही. पण आपण आपल्या अभिरुचीत, साहित्य समजुतीत आणि अनुभवविश्वाच्या नेमकेपणाकडे साहित्याच्या नजरेने पाहायचे असेल तर बुद्धीला सतत समीक्षेच्या झोतभट्टीत तापवले पाहिजे. पोलादाला आकार देण्यासाठी जर ते तापवणे आवश्यक असते आणि त्यानंतर त्याची पाहिजे ती रचना करता येत असेल तर आपण आपल्या बुद्धीलाही समीक्षेच्या अग्नीमध्ये तापवणे आवश्यक आहे. जाधव सर हा प्रयत्न करतात.

ययाती, पदमनजीकृत अरुणोदय, मराठी साहित्य समीक्षेचे दृष्टिकोन, वाङ्मयीन परंपरेबद्दलचे समज, लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे पुनरावलोकन, वि. स. खांडेकर एक दृष्टिकोन या त्यांच्या प्रकरणातून त्या महान लेखकांच्या, विचारवंतांच्या साहित्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होतो. दृष्टी मिळते. समीक्षकांचे काम हेच असते आणि जाधव सर, ऋजू, संवेदनशील स्वभावाचा समीक्षक हे महान कार्य सहज करत जातो. पुस्तक अप्रतिम आहे. हे समीक्षेच्या प्रांतात ज्यांना मुशाफिरी करायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे. प्रा.रा.ग. जाधव हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अनेक वर्ष वाईमध्ये त्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे हे पुस्तक आणि जाधव सर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रथमतः आपलेपणाची भावना आहे, आणि मग साहित्य समीक्षा यांचा विचार आहे.

  • पुस्तकाचे नाव – समीक्षेतील अवतरणे
  • किंमत – रु. १००/-
  • प्रकाशक – स्नेहवर्धन पब्लिशिंग
  • प्रकाशन साल – २००५
  • पृष्ठसंख्या -ृ १४३

– मधूसुदन पतकी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये