Pune News: २८०५ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा शुक्रवारी ६ वा दीक्षांत समारंभ
पुणे | MIT-ADT University – एआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे ६ व्या दीक्षांत समारंभाचे शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वा. आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकार) यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर विश्वशांती डोम, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे पार पडणार आहे.
यंदा विद्यापीठातील विक्रमी २८०५ विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून पदवी बहाल करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे (MIT ADT University) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बंगळुरूचे माजी चेअरमन पद्मश्री. डॉ.ए.एस.किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाने २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. २०१६-१७ मध्ये २६ विद्यार्थ्यांना पदवी देऊन सुरू झालेली विद्यापीठाची अविश्वसनीय परंपरा यंदा विक्रमी २८०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यापर्यंत आली आहे. यंदाच्या भव्य समारंभात २३ विद्यार्थ्यांना पीएचडी, ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर १८८ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह ७ हजारपेक्षा अधिक लोक देशभरातून हजर राहणार आहेत.
विद्यापीठाने परीक्षेसाठी संपूर्ण डिजिटल प्रणाली अवलंबली असून, त्यामुळे निर्विघ्न परीक्षेची अंमलबजावणी, वेळेत अचूक निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता खासियत बनली आहे.
दीक्षांत समारंभाच्या आजतागायत झालेल्या ५ कार्यक्रमांत मा.श्री.विनोदजी तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी.माधवन नायर, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ.जी.सतीशरेड्डी, इस्त्रोचे चेअरमन डॉ.एस. सोमनाथ यांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे यंदा आम्ही नितीन गडकरी यांचे विद्यापीठात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा विभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. वीरेंद्र शेटे यांनी यावेळी दिली.
“यंदाच्या दीक्षांत समारंभात 23 पीएचडी, ५१ विद्यार्थ्यांना
सुवर्णपदकांसह एकूण २८०५ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटीतर्फे पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.श्री.नितीनजी गडकरी व पद्मश्री. डॉ.ए.एस किरण कुमार विद्यापीठात येणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.”— प्रा.डॉ. मंगेश कराड, कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे