अभिनेत्री नुसरत भरूचाने सांगितला इस्रायलमधील अंगावर काटा आणणारा अनुभव
मुंबई | इस्त्राईलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. हमास नावाच्या दहशतवादी संघटनेनं इस्त्राईलवर रॉकेटचा मारा केला आणि परिसरातील अनेक शहरं बेचिराख करुन टाकल्याचे दिसून आले आहे. मात्र यासगळ्यात बॉलीवूडची अभिनेत्री नुसरत भरुचा ही इस्त्राईलमध्ये अडकून पडली. ही बातमी समोर येताच वेगानं सुत्रं फिरली आणि अभिनेत्रीशी संपर्क साधण्यात आला. इस्त्राईलमधील भारतीय दुतावासानं अभिनेत्रीची मदत केली आहे.
अभिनेत्री नुसरत भरूचा एका फिल्मफेस्टिवलसाठी ती इस्त्रायलला गेली होती, मात्र सुदैवानं नुसरत आता सुखरुप मायदेशी परतली आहे. नुसरत भारतात परतल्यानंतर तिला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. तिनं माध्यमांशी संवाद साधायला नकार दिला होता. आता पहिल्यांदाच तिनं यासगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली अभिनेत्री ?
माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, तुम्ही माझी चौकशी केली त्याबद्दल थॅंक्यू. आता मी सुखरुप आहे. दोन दिवसांपूर्वी मी सकाळी उठले ते मोठ्या आवाजामुळं. आमच्या हॉटेलच्या चारही बाजूंना जोरदार हल्ले होत होते. फायरिंगचा आवाज येत होता. मी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर आम्हाला हॉटेलच्या तळघरात घेऊन जाण्यात आलं. मी पहिल्यांदाच हे सगळं पाहत होते. पण आज मी माझ्या घरी अगदी सुरक्षित आहे. त्यामुळं मला आता कळतंय की आपण किती नशिबवान आहोत की आपण भारतात राहतोय. आपण सुरक्षित आहोत.
यासोबतच नुसरतनं भारत सरकार तसंच भारतीय आणि इस्त्रायल दूतावासाचे आभार मानले आहेत. नुसरतच्या या व्हिडिओ नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.