हिरवागार पेरु खा आणि स्वस्थ राहा.. बहुगुणी पेरुचे १० फायदे
Benefits Of Guava : हिरव्यागार पेरूला तिखट – मीठ लावून खाण्यात काय आनंद असतो, हे फक्त पेरू खाणाऱ्यालाच माहित असते. थंडीचे दिवस सुरु झाल्यावर सर्वांच्या खिश्याला परवडणारा पेरु म्हणजे आरोग्य आणि सौदर्यांसाठी रामबाण उपाय आहे. चवीला तुरट, गोड आणि आंबट असणारा पेरु पोषक तत्वांनी युक्त असतो. पेरुच्या विविध जाती आहेत. पेरु आतून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो. हे दोन्हीही पेरु चवीला गोड आणि रुचकर लागतात. आंबट-गोड चवीच्या पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात
१) पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी व फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपल्याला जर वजन जर कमी कराचे असेल तर हे फळ फायदेशीर आहे. या फळात साखरेचे गुणधर्म कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी देखील लाभदायक आहे.
२) जर आपल्याला पोटाचे विकार झाले असतील तर पेरूवर मीठ लावून खाल्ल्याने पोटासंबंधीच्या समस्या दूर होतात. आपल्या पचन व्यवस्थेसाठी पेरू हा उत्तम पर्याय आहे.
३) पेरू हे उच्च ऊर्जा असलेले फळ मानले जाते . त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे, तसेच पेरूमध्ये कॅलरी आणि कार्ब्सची चांगली मात्रा असते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते आणि आळस दूर होतो.
४) पेरूमध्ये जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पेरू खाणे हे स्किन आणि केसांसाठी उपयुक्त ठरते.
५) पेरूमध्ये एकूण ८०% पाणी असते. पेरूचे सेवन केल्याने स्किनमधील ओलावा कायम टिकून राहतो. यामुळे स्किन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरूचा रस प्यायल्यास शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
६) पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास किंवा तो काढा थोडा वेळ तोंडात धरून ठेवल्यास दंतविकार, हिरडय़ांची सूज व तोंडाचे विकार दूर होतात.
७) लहान मुले, गर्भवती स्त्रिया, अशक्त स्त्रिया, कृश व्यक्ती यांनी पेरूचे नियमित सेवन केल्यास, यामध्ये असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे व इतर पौष्टिक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून शरीर सुदृढ व मजबूत होते.
८) मूळव्याधीच्या समस्येमुळे मल त्याग करताना खूप त्रास होतो, अश्या परिस्थितीत रिकाम्या पोटी पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.
९) तोंडाची चव गेली असल्यास, उलटी किंवा मळमळ झाल्यासारखं वाटत असल्यास पेरुचे सरबत अधिक फायदेशीर ठरते.
१०) पेरू शरीराच्या सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन सुधारण्यास मदत करते. पेरू खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकतो. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते.