अशी आहे सोलापूर लोकसभेची ‘ग्राउंड रियालिटी’
सोलापूर | नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्ववादी चेहरा आणि विकास कामांची जोरदार जाहिरात बाजी याच्या जोरावर राम सातपुते यांच्या विजयाचे दावे केले जात आहेत. नरेंद्र मोदी यांचा आश्वासन चेहरा हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख तोंडवळा आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये असलेल्या आमदारांचा पाठिंबा आणि लाभार्थ्यांची, हिंदुत्ववादी जनतेची मते हे त्यांचे प्रमुख शक्ती स्थळ आहे. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख सह कार्यरत असलेली प्रचार यंत्रणा आणि बडे बडे नेत्यांचे कॅम्पेन हे राम सातपुते यांच्या जमेची बाजू आहे.
तर दुसरीकडे यापूर्वीचे भाजपाने दिलेल्या दोन्ही उमेदवारांची निष्क्रियता तसेच भाजपाने ग्राउंड लेव्हलवर दाखविलेल्या कामाची उदासीनता आणि राम सातपुते यांचे उपरे पण जनमानसात ठसले आहे . सर्वच विधानसभेचे आमदार त्यांच्या विजयासाठी झटत असताना देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी , ‘ सोलापूर अवघड ‘ असल्याची दिलेली प्रतिक्रिया ही सर्व काही सांगून जाते. ‘ लेक सोलापूरची ‘ या कॅम्पेन खाली प्रणिती शिंदे यांनी लेटर बॉम्ब च्या स्वागता मधूनच त्यांच्या उमेदवारीला उपरे पण चिटकले गेले.
मागील दोन्ही निवडणुकांमध्ये वंचित विकास आघाडीच्या मत विभागणीचा मोठा फॅक्टर यंदा सातपुते यांच्या मदतीला येणार नाही . शेवटपर्यंत उमेदवारी देण्याबाबत भाजप ला दमछाक करावी लागली. त्यामुळे भाजपाकडे खासदारकीसाठी सर्वसामावेशक चेहरा नसल्याचाच संकेत गेला. शेवटी उपरा उमेदवार आयात करून येथे उमेदवारी द्यावी लागली , ही भावना भाजपा सहित जनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे सातपुते यांचे नेतृत्व ‘आपले’ वाटत नाही, महास्वामी, बनसोडे यांच्यानंतर पुन्हा ‘तसाच’ उमेदवार ही मतदारांची भावना झाली. त्यामुळे विजयासाठी बरीच आव्हाने दिसून येतात.
‘लेक सोलापूरची’ ही प्रतिमा घेऊन मैदानात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी दोन महिन्यापूर्वीच निश्चित असल्याने त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. तरुण आणि महिला उमेदवार, जातीची समीकरणे या सगळ्यातच त्या सुरुवातीपासून सरस ठरल्या. भाजपच्या महास्वामी, बनसोडे या निष्क्रियतेचा कलंक त्यांच्या पथ्यावर पडला . सुशीलकुमार शिंदे यांची गेल्या अनेक वर्षापासून ची रुजलेली पाळेमुळे त्यांच्या जमेची बाजू आहेत..वंचितच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेऊन प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी मोठा हातभार लावल्याचे दिसते तसेच मुस्लिम मतांचा एक गठ्ठा, जो काँग्रेसचा आणि वैयक्तिक शिंदे यांचा पारंपारिक मतदार मानला जातो, तो देखील यंदा त्यांच्यामागे आहे . एमआयएम ने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मोठी मत विभागणी टळली. चिमणी प्रकरणामुळे लिंगायत समाज भाजपापासून दुरावला होता. समयसूचकता दाखवत तो पुन्हा जोडून घेण्यात शिंदे यांना यश आले. राजकीय भूमिका वेगवेगळ्या झाल्या तरी देखील सुशील कुमार शिंदे यांचा कोणावरही टोकाची टीका किंवा वैयक्तिक वैर न ठेवण्याचा स्वभाव असल्यामुळे वाले, शिवदारे, चाकोते, कोठे, बेरिया, आडम या अनेक जुन्या जाणत्याची एकत्रित मोट बांधण्यात त्यांना यश आले . याच स्वभावामुळे महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनाही शिंदे यांच्यासाठी काम करण्यात फारशी अडचण वाटत नाही. महाविकास आघाडी एक दिलाने कामाला लागली . त्यामुळे ताकद एकवटली गेली. मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ या ठिकाणची शिंदे यांची जुनी जाणती ‘राजकीय नातीगोती’ वेगाने कार्यरत झाली. आक्रमक, धाडसी आणि युवा नेतृत्व म्हणून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी ठसली गेली. दहा वर्षाच्या निष्क्रिय कारकिर्दी नंतर जनतेला बदल हवा आणि त्यात प्रणिती ताई यांच्यासारखा आश्वासक चेहरा समोर आल्याने काँग्रेससाठी आशादायक वातावरण आहे.
तथापि दुसरीकडे प्रचारामध्ये असलेला विस्कळीतपणा ,मीडिया मॅनेजमेंट सह कार्यकर्त्यांच्या बूथनिहाय – प्रभाग निहाय नियोजनात देखील उडालेला गोंधळ ही काँग्रेसच्या कॅम्पेनची दुखरी बाजू म्हणावी लागेल. , शिंदे यांना स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी घट्ट बांधून ठेवता आली नाही. सर्वधर्म समानतेच्या अति आग्रहामुळे हिंदुत्ववादी मतांचा एक वर्ग कायम दुखावलेला असतो . जिल्ह्यातील विधानसभेमध्ये कुठेच काँग्रेसचे प्रतिनिधित्व नाही. याची उणीव दिसते. स्वतःच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष तुरुंगात आहे . पक्षसंघटनेची सक्षम यंत्रणा नाही , सर्व तालुका अध्यक्ष निष्क्रिय आहेत या उणीवा ठळकपणे जाणवतात.
मूळ काँग्रेसच्या परंपरेचा गड असणारा सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ गेल्या दोन्ही टर्म मध्ये भाजपाकडे गेला . परंतु भाजपाने त्या संधीचे सोने केले नाही तर माती केली आणि मतदारांच प्रचंड भ्रमनिरास केला . ‘ पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचा आहे ‘ या विचारातून ‘ मोदी का परिवार ‘ साठी भाजपाने मतांची मागणी केली आहे तर ‘ आता बदल हवा ‘ आणि रखडलेल्या सोलापूरला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी सक्षम नेतृत्व हवे या प्रचारातून काँग्रेसने पुन्हा एकदा मोट बांधली आहे. संपूर्ण राज्याभरामध्ये अटीतटीची मानली जाणारी ही निवडणूक प्रचंड चुरशीची बनली आहे.
राम सातपुते :
++++ प्लस पॉईंट
- ‘ लाभार्थी गटां’ च्या मतावर भिस्त
- काटेकोर प्रचार यंत्रणा , नियोजन
- हिंदुत्ववादी मते
- सर्व विधानसभांच्या आमदारांचे बळ
- सत्ता पक्षाचा उमेदवार असल्याने यंत्रणांची अंतर्गत साथ
—– मायनस पॉईंट - निष्क्रिय खासदारांच्या परंपरेचे जोखड
- बाहेरचा – आयात उमेदवार
- मग्रुर , कृतघ्न , दमबाजी ही प्रतिमा
- व्यक्तिगत प्रभाव नाही
- ग्रामीण मध् जरांगे फॅक्टरचा फटका
प्रणिती शिंदे :
+++++ प्लस पॉईंट
- तरुण , महिला , आक्रमक आणि स्थानिक नेतृत्व
- राष्ट्रवादी , शिवसेना यांच्या मतांची साथ
- कोठे ,बेरिया, आडम , शिवदारे , माने : तुटलेले मणी जोडले
- वंचित ची माघार , एम आय एम चा पाठिंबा
- जरांगे फॅक्टर मुळे मराठा मतांचे बळ
——- मायनस पॉईंट
- शिस्त आणि नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेचा ,
- बुथव्यवस्थेचा अभाव
- सर्वधर्म समानतेच्या दुराग्रहामुळे एक गट नाराज
- इतर विधानसभात कार्यकर्त्यांची दमदार फळी नाही
- पक्ष संघटनेचे जाळे निष्प्रभ , जिल्हाध्यक्ष फरार