“तुमच्यात धमक आहे तर काढा ना नवीन पक्ष…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना आव्हान
मुंबई | Jitendra Awhad : काल राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचा निर्धार मेळावा पार पडला. हा मेळावा कर्जतमध्ये (Karjat) पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाबोल केला. तसंच त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले. अजित पवारांनी केलेल्या या टीकेनंतर आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाल आहे. शरद पवार गटाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आव्हाडांनी अजितदादांवर टीका केली आहे. आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार हे एकनाथ शिंदेंवर टीका करताना दिसत आहेत. तसंच तुमच्यात धमक असेल तर दुसरा पक्ष काढा, असा सल्ला ते एकनाथ शिंदेंना देताना दिसत आहेत.
अजित पवारांचा हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे, दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म आदरणीय शरदचंद्रजी पावर साहेबांनी दिला, त्याचं पालन पोषण ही पवार साहेबांनी केलं, त्याचं संगोपन पुढे पवार साहेबांनीच केल. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखिल पवार साहेबांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जसं आपण म्हटलात तसं घ्याना आणि एक नविन पक्ष काढा, नविन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा, असं थेट आव्हान जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना दिलं आहे.