राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचर

कर्णपत्नी, बहिष्कृताची राणी

एका नव्या अंगाने, एका नव्या दिशेनं कर्ण आणि महाभारत उलगडून दाखवणारी जबरदस्त कादंबरी! त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुखातून व्यक्त होणारी ही हृदय स्पंदनं! कोण आहे त्याची दुसरी पत्नी? कशी आहे?
ती नुसतीच सुंदर नाही तर त्यापेक्षा ती चतुर आहे. हुशार आहे. पूकेय देशाचा राजा वहुषची लाडकी कन्या आहे. कोणत्याही पित्यासाठी त्याची मुलगी म्हणजे जीव की प्राण! पण हाच तो काळजाचा तुकडा मात्र वडिलांचे काळीज चिरून टाकतो.. समाजाने बहिष्कृत केलेल्या राधेयाच्या, कर्णाच्या प्रेमात पडली आहे. त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरून बसली आहे.

कर्ण कसा आहे, याची जाणीव तिला नाही, असे अजिबात नाही. उरुवी, पांडवासोबत वाढलेली आहे. कुंतीची अतिशय लाडकी आहे.ती जणू कुंतीची सावलीच! कायम तिच्या मागेपुढे करणारी.. त्यामुळे तिला कर्ण कोण आहे हे जरी माहीत नसले, तरीही तो कसा आहे, हे माहिती आहे.

महाराणी गांधारीला जो अजिबात आवडत नाही, द्रोणाचार्यांना जो उद्धट वाटतो, पितामह भीष्म ज्याला उपटसुंभ म्हणतात असा तो कर्ण! समाजात ज्या चार जणांची निंदा होते, ज्यांना चांडाळ चौकडी म्हणतात त्यांमध्ये कर्ण हा एक आहे , याची जाणीव तिला आहे… तरीही तिला पती म्हणून कर्ण हवा आहे.

त्याच्या सामाजिक स्थितीचीही तिला पूर्ण कल्पना आहे. सुतपुत्र आहे तो ! त्याचा दर्जा हा सेवकांचा आहे. राजवाड्यात ज्यांना राहायला ही परवानगी नसते अशा जातीचा तो तरुण आहे. जशी ही जाणीव तिला आहे, तसेच तो लग्न झालेला आहे.त्याला एक पत्नी आहे हेही तिला माहीत आहे…तरीही ती स्वतःचे जीवन त्या ज्वालेत टाकायची इच्छा धरून आहे.

आई, वडील आणि कुंती, पितामह सारख्यांना ती अर्जुनाची पत्नी होईल, अशी अपेक्षा आहे… या सर्वांना धक्का देऊन ती नको त्याच्याशी विवाह करू इच्छित आहे. जे समाजमान्य नाही. अन्य क्षत्रिय समाज याचा निषेध करेल, याची तिला खात्री आहे…विवाहप्रसंगी संग्रामही होऊ शकतो, याची तिला जाणीव आहे…तरीही ती मात्र कर्णाच्या प्रेमात अखंड बुडाली आहे…पण हे प्रेम एकतर्फी आहे. कर्ण ना तिला ओळखतो ना तिची कधी भेट घेतो.

द्रौपदी स्वयंवरात अपमानित झालेला कर्ण आता कोणत्याही स्वयंवरात जायला धजावत नसताना त्याला पुकेय राजा वहुष यांचे आमंत्रण आलेलं पाहून आश्चर्य होतं. सुतपुत्र कर्ण कधी असा आमंत्रित केला जात नसे….त्याची इच्छाही नसे….मग हा जातो का उरुवीच्या स्वयंवरात? का जातो? त्याला तर कल्पनाही नसते तिच्या प्रितीची! का पुन्हा अर्जुनाचा एक विजय पाहायचा होता? की त्याची नवीन होणारी पत्नी पाहायची होती? का द्रौपदी स्वयंवरात झालेला अपमान जो त्याच्या हृदयात खोलवर बसला होता, त्याला पुन्हा नव्याने अनुभवायचे होते? का त्याची पावले वळली त्या स्वयंवरात?

काय घडते मग तिथे? कृष्ण आणि कुंतीही होते तेथे… त्यामुळे निश्चितच स्थिती हाताबाहेर गेली नसणार… पण क्षत्रिय गप्प बसतील ते कसले? आणि ती चांडाळ चौकडीमधील तिघे होतेच ना! सर्वांना धक्का देत जेव्हा उरूवी कर्णाच्या गळ्यात हार घालते तेव्हा कुंतीच्या चेहऱ्यावर आनंद का दिसला?
या कादंबरीतील एकेक वर्णन आणि एकेक प्रसंग अतिशय तपशीलवार चित्रित केला आहे. वर्णन आणि संवाद यांच्यात वाचक हरवून जातो.

कुंती, द्रौपदी, भानुमती, उरूवीसारख्या राज घरातील स्त्रियांच्या मनाचे कप्पे या कादंबरीत अलगद उलगडत जातात. लेखिका आणि अनुवादक दोघीही महिला असल्याने या कादंबरीची उंची अधिक व्यापक ठरली आहे. मनात असलेले मानवी राग, लोभ, प्रेम, मत्सर यांना अतिशय प्रभावीपणे व्यक्त केले आहे.

एकेक प्रसंग वाचताना वाचक भान हरपून जातो….नवरा झाला म्हणून काय झालं? त्याचे दोष त्याच्या पदरात टाकणारी उरुवी काही प्रसंगी खूप महान वाटून जाते…अगदी नवऱ्यापेक्षा ही उंच! लग्नानंतर पहिल्या रात्री कर्ण तिला विचारतो की, ‘का तिने त्याला वरले? कारण त्याच्या भूतकाळाची छाया त्याच्या वर्तमानात पडत आहे आणि ज्याचा भविष्यकाळ अस्पष्ट असताना त्याच्याशी तिने का विवाह केला आहे?’ त्यावर ती म्हणते,’ तू का आला होता स्वयंवरात?’

असे अनेक प्रकारचे संवाद या कादंबरीची उंची उंचावत नेतात…कधी पती-पत्नीचा तो नाजूक संवाद तर कधी दुखावलेल्या मनाचा तीव्र आक्रोश, तर कधी फुललेला अंगार! राजसभेत कर्ण सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून जातो. त्याच्या मनातील ओंगळवाणे विचार मुखातून बाहेर पडतात. पांडवांच्या पत्नीला तो वेश्या म्हणतो….एका स्त्रीला आपल्या नवऱ्याने या पद्धतीनं बोलणे, तिची विटंबना चालू असताना मूक बसणे किंबहुना प्रोत्साहित करणे अशा प्रकारच्या आपल्या नवऱ्याची अपकीर्ती झालेली पाहून ही स्वाभिमानी स्त्री त्याला खडे बोल सुनावते.

कर्ण स्वतःच्या मनाचा राजा! पण त्याला घरी गेल्यानंतर एखाद्या अपराध्याला उभं करावं तसं उभं करून त्याच्या पापाचा पाढा वाचणारी त्याची पत्नी जेव्हा त्याला म्हणते, “शब्दांनी तर तूच द्रौपदीचे वस्त्रहरण केलं आहेस.” ही मानिनी त्याला सोडून माहेरी निघून जाते. त्या आधी संताप, अपमान आणि सुडाने पेटलेल्या पांडवांची भेट घेते. या प्रसंगाचेही वर्णन वाचून वाचकाला ही आपण तिथेच आहोत असं वाटू लागतं.

संतापाने लाल झालेला तिचा बालमित्र अर्जुन तिला हाकलून देण्यासाठी तारस्वरात उरुवीचा पाणउतारा करतो…पण कुंती या ठिकाणी येऊन तिला आधार देते.स्वतःचा आणि द्रौपदीचा हवाला देऊन त्याला शांत करते. चार पुरुषांचा संग करणारी स्त्री ही समाजात वेश्याच म्हटली जाते…..त्या अर्थानं कर्ण बोलला अशी भूमिका घेते….अर्जुनाची आग वरकरणी शांत जरी झाली असली तरीही द्रौपदी? ती कशी शांत होणार? जिचा जन्मच अग्नितून झाला आहे.जी यज्ञातून जन्मली आहे. तिचा जन्मच मुळात प्रतिशोध घेण्यासाठी झाला आहे…. प्रसंग लेखिकेने अतिशय प्रभावीपणे लिहिले आहेत.

मृत्युंजयसारख्या कादंबरीत कर्ण फारच सद्गुणांचा पुतळा दाखवण्यात आला आहे. अर्थात मूळ महाभारतात तसे नाही. तसेच या कादंबरीत ही तसे नाही. तो शूर आहे. वीर आहे. दानशूर आहे…पण तो चांडाळ चौकडीतील एक आहे. द्युत क्रीडेच्या कपटात तो पूर्णपणे सहभागी आहे.

द्रौपदी वस्त्रहरण प्रकरण झाल्यानंतर उरुवी आपल्या पतीला माफ करत नाही. त्याचा त्या घाणेरड्या प्रकरणात हात होता, हे ती त्याला निक्षून सांगताना तर त्याला सोडून आपल्या माहेरी निघून जाते…पण यात अजून एक पदर आहे…नवरा द्रौपदीला असभ्य बोलला हा एक तर मोठा पदर आहेच…पण त्या सोबत एक नाजूक पदरही आहे.द्रौपदी कर्णाला माफ करते… ती असे का करते? का तिच्या मनात त्याच्याविषयी कणव निर्माण झाली? एक पत्नी म्हणून जो बायकांच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होतं, ते उरुवीच्या ही मनात निर्माण होते.

उरुवी आणि कुंती यांचा विशेष स्नेह असल्यानं कुंती आपल्या मनातील अनेक दडलेले, दडपून ठेवलेलं विचार व्यक्त करते. नीती आणि न्याय हे व्यक्ती सापेक्ष बदलत गेलेले आहेत. स्वतःचा वंश वाढावा, राज्याला वारस लाभावा म्हणून राजमाता सत्यवती ने केलेला प्रयत्न! आपल्या सुनांच्या मनाचा विचार न करता त्यांच्यावर झालेला नियोग विधीचा प्रयोग असेल किंवा कुंती माद्रीची पुत्रप्राप्ती अशा या नाजूक गोष्टी कुंती उरुवीजवळ मोकळेपणे बोलते.

वरील वर्णन वाचून नकळत ही कादंबरी म्हणजे महिला विशेष आहे, असे सहजच वाटून जाईल…पण प्रत्यक्षात असे नाही. महाभारत म्हणजे कट, कपट आणि कारस्थान असे सूत्र आहे.तसेच ते शौर्य, पराक्रम आणि विजय असेही आहे. महाभारताचा प्राण हा त्याच्या महायुद्धात आहे.त्याशिवाय ते पूर्ण होत नाही. या कादंबरीत ही हे भयंकर मृत्युचे तांडव अतिशय प्रभावीपणे चित्रित केलं आहे.

जेथे भाऊ भावाला, भाचा मामाला, पुतण्या काकाला मारण्यासाठी सिद्ध होता.एकमेकांच्या जिवाचे वैरी झालेले हे अाप्तजन जणू विधात्याच्या हातचे बाहुले होऊन लढत होते. भिडत होते. मेलेल्या प्रेतावरून पुढे चढत होते. एकच चित्र होते…रक्ताची नदी वाहत होती… मृत्यूचे महाथैमान चालू होतं…अखंड अठरा दिवस!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये