राष्ट्रसंचार कनेक्टलेखसंडे मॅटिनी

माणदेशी कर्तृत्वाचा ठसा : श्री. शहाजीराव बलवंत

कृतार्थ जीवनाची प्रारंभापासून एक दिशा असते. ती सुनिश्चित असते. बालवयात जोपासलेली संस्कृती, अंगीकारलेले संस्कार आणि परिस्थितीचे भान या मुलभूत बाबींवर आणि कर्म बलावर जीवनाची ही वाटचाल एका दिशेने सुरू असते. परिस्थितीचे भान ठेवताना गर्भश्रीमंतीच्या ऐश्वर्यावर लोळण घेणारे व्यक्तिमत्व आणि दारिद्रयाचे चटके सहन करत करत, पोटाची भूक मारत मारत सुनिश्चित झालेल्या दिशेने आत्मविश्वासाने जाणे यालाच कृतार्थ जीवन संबोधले जाते.

असे जीवन गरजवंतांना, नशीबवंतांना लाभते असे नाही, तर जीवनाची दिशा फरफटत न देता आत्मविश्वासाच्या बळावर असे जीवन लाभत असते. माझे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व सरस्वतीपुत्र श्री. शहाजीराव भानुदास बलवंत यांच्या जीवनाकडे पाहिले तर खऱ्या अर्थाने कृतार्थ जीवनाची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही. या दीपावलीच्या सणात अशा व्यक्तिमत्वावर शब्दांचा वर्षाव करता करता प्रेमाचा वर्षाव करत करत त्यांच्या सद्‌गुणांचे अंथरुण पसरत पसरत लाखोतल्या एखाद्याने जरी श्री. बलवंत यांच्या कृतार्थ जीवनाची पाठराखण केली तर तो हा दीपावलीचा सण अगणित आनंदाने माझ्यासारख्या व्यक्तिरेखेला पुरुन उरेल.
आयुष्यभर अत्यंत परखड आणि स्वच्छ हाताने पत्रकारिता करताना असंख्य परिचितांचे मोहोळ जे निर्माण झाले त्या मोहोळातील मध काढणारी ही एक मधमाशी म्हणजे श्री. शहाजीराव बलवंत होय. अचानकपणे आणि योगायोगाने या चार-पाच महिन्यांत त्यांचा परिचय झाला आणि हळूहळू तो विलक्षण आदरापर्यंत पोहोचला. आदर दोन कारणांसाठी अधोरेखित होत असतो. एक- जीवनातील स्वच्छपणा आणि दुसरे- आपल्याजवळचे दुसऱ्याला देण्याची वृत्ती.

शहाजीराव बलवंत हे असेच एक व्यक्तिमत्व. त्यांचे बालपणाचे जीवन अत्यंत खडतर. खडतर जीवन हा शाप नसतो. संत ज्ञानेश्वर महाराजांना विद्वत्तेची पराकाष्टा, ज्ञानाची परिसीमा आणि अध्यात्मिक क्षेत्रातला हिमालय एवढी उंची प्राप्त होतानासुद्धा सिद्धबेटात राहताना दुपारची भ्रांत शांत करण्यासाठी घरोघरी जाऊन भिक्षापात्र पुढे करावे लागले. आज या विश्वात त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, त्यांचे अफाट ज्ञान आणि त्यांच्या संजीवन समाधीची तेजस्वीता विश्वपरिचित झालेली आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आता अलिकडे लाल बहादूर शास्त्रींचे उदाहरण घ्या, इतकेच नव्हे तर झोपडीत वास्तव्य करणाऱ्या आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत त्यांच्या जीवनाचा धांडोळा घ्या. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल, कृतार्थ जीवनाची त्यांची दिशा ही सुनिश्चितच होती. श्री. बलवंत अशातीलच एक व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५४ साली माण भागातील खवासपूरमध्ये राहणाऱ्या कुटुंबात झाला.

नवसाला गरीबी आणि दारिद्रयाचा शापच. अनेक थोरा-मोठ्यांच्या नशिबी दारिद्रयाच्या आणि संपन्नतेच्या शिवाशिवीच्या खेळाला बळी पडलेले हे कुटुंब. पिंपरीखुर्द येथे प्राथमिक शिक्षण घेत घेत पूर्ण अंध:कार झालेली नशिबाची, कुटुंबाची आणि कर्माची दिशा पुसटशी अंधुक दिसू लागली. वडील भानुदासजी गावात पखालीने पाणी पुरवठा करायचे आणि त्यावर गुजराण व्हायची. नशीबाच्या भोगापेक्षा, कर्माच्या अस्तित्वापेक्षा प्रयत्नांची पराकाष्टा हा बलवंत सरांचा स्थायीभाव बनला. माध्यमिक शिक्षण दिघंची येथे घेऊन पंढरपूरच्या महाविद्यालयात उच्च शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि अंधुक दिसत असलेली दिशा स्पष्टपणे जाणवण्याइतकी स्पष्ट दिसू लागली. पुढे एम.ए. (इंग्रजी)पर्यंत शिक्षण घेऊन बी.एड. केले आणि अस्पष्ट दिसणारी दिशा हळूहळू अधोरेखित होत गेली. काही दिवस शिक्षकी पेशा केल्यानंतर लोकसेवा आयोगाद्वारे शासकीय नोकरीपर्यंत पोहोचले. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात पहिली नियुक्ती होताच अनेक खात्यात काम करण्याची संधी मिळाली. कल्याण, डोंबिवली, मंत्रालय येथे शासकीय सेवेत प्रामाणिकपणे सेवा बजावता बजावता दिशा समर्थपणे पेलण्याची भूमिका घेतली. याच दरम्यान निसर्गाने संकट ओढावले आणि लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या प्रचंड भूकंपाने शेकडो घरे उद्‌ध्वस्त झाली.

त्यांना शासनाच्यावतीने मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर आर्थिक मदतीची जबाबदारी अधिकारी स्तरावर त्यांच्यावर देण्यात आली. मृतदेहांच्या अंगावरचे लोणी खाणारे शासकीय अधिकारी त्यावेळीसुद्धा आपल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी जणू नियतीनेच आपल्यावर सोपवली आहे, ती पार पाडताना दिसतानाच लाखो-कोट्यावधी रुपये भुकंपात उद्‌ध्वस्त झालेल्यांना देण्यासाठी बलवंत यांनी प्रामाणिकपणाचा एक वेगळा आदर्श शासन यंत्रणेपुढे घालून ठेवला. शिक्षण खात्यातही अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत राहून सेवा बजावताना हात स्वच्छ आणि मन निर्मळ याचे भान ते कधी विसरले नाही. माणदेश हा माण, आटपाडी, सातारा जिल्ह्याचा काही भाग, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील काही गावे यांचा मिळून बनलेला भाग. माणदेशी बाणा श्री. शहाजीराव बलवंत यांच्या नसानसात आजही जाणवतो. प्रचंड वाचनाची आवड निर्माण झाली. श्री. कुलकर्णी नावाचे कुणी एक मित्र यांच्याद्वारे आधुनिक वाल्मिकी कै. श्री. ग.दि.मा., कै. व्यंकटेश माडगुळकर या सरस्वतीपुत्रांच्या प्रेमाचा लाभ त्यांना झाला. जीवापाड प्रेम केलेल्या आण्णांनी त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यकृतींनी ते भारावून गेलेच, पण अखेरपर्यंत त्यांच्या प्रेमाचे भागीदार राहिले.

ग.दि.मा. हे एक विलक्षण व्यक्तिमत्व. मी स्वत:ही त्यांच्या प्रेमाचा अत्यंत जवळचा परिचित असल्यामुळे त्यांच्या प्रेमाचा साक्षात्कार तितक्याच उत्कंठेने जाणवता येईल. साहित्य शारदेच्या दरबारात श्री. शहाजीराव बलवंत यांनी प्रवेश केला. लहान-मोठी कथानके, वृत्तपत्रातील लेख लिहित लिहित त्यांनी ‘माणमाती’ नावाचे आत्मनिवेदन प्रसिद्ध केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दारिद्रयाची चव घेता घेता एका सरस्वतीपुत्रापर्यंत मजल गाठलेल्या या सरस्वतीच्या सेवकाने लिहिलेल्या या ग्रंथावर चार विद्यार्थ्यांनी एम.फील. ही पदवी प्राप्त केली. कारण मिळालेली दिशा आणि अात्मविश्वासाचा संकल्प साथीला होता म्हणून श्री. बलवंत एक वेगळ्या आविष्काराने प्रभावित झाले. एका कादंबरीचे लिखाण झाले. नुकतीच ‘वंदना’ नावाची त्यांची कादंबरी प्रचंड गाजली. आपल्या लेखन शैलीच्या संवेदना सामान्य माणसाचा आर्त स्वर त्यांनी बनवला. वंदना कादंबरी ही एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची कहाणी. पण त्यातील प्रत्येक शब्द अंत:करणाचे वेध घेऊन जातो आणि जाती-पातीच्या संवेदनांची जाणिव करून देतो. श्री. शहाजीराव बलवंत यांचा सहवास होताना एक वेगळा आनंद वाटतो. या आनंदात दीपावलीसारख्या आनंदाच्या क्षणाला अशा व्यक्तिमत्वावर अक्षरांची उधळण करून त्यांच्या कर्तृत्वाचे निनाद समाजात घुमवताना एक वेगळे समाधान वाटते. त्यांच्या बलवंत प्रतिष्ठानला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देताना आनंदाची गवसणी घातल्याचा भास निर्माण होताना दिसतो.

जेष्ठ पत्रकार- बाळासाहेब बडवे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये