राष्ट्रसंचार कनेक्टलेखसंडे मॅटिनी

दिवाळीला उभारू गड किल्ले, इतिहासाची जमवू गट्टी…

गड किल्ले ठेवा जोपासण्यासाठी उभारू संवर्धनाची गुढी…

दिवाळी मध्ये किल्ला का बनवतात

आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड ह्यांना अगदी पूर्वीच्या काळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. आपले किल्ले हे पूर्वजांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा हि त्याच्याशीच निगडित आहे. येणाऱ्या पिढीमधील कणखर पना जागृत व्हावा आणि हिंदवी स्वराज्याचे स्मरण व्हावे. आपल्या लहानग्यांना ह्याच इतिहासाची आणि पराक्रमाची माहिती व्हावी तसेच त्यांना त्याची गोडी लागावी हा एक उद्देश दिसून येतो.किल्ले बनविण्याची परंपरा हि मराठा सैन्याने शत्रूवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून पण अस्तित्वात आली आहे.तसेच मराठी संस्कृती हि खूप जुनी आहे आणि त्याची लहान मुलांना आवड निर्माण व्हावी, बालवयापासूनच अनेक मुले एकत्र आल्याने त्यांमध्ये संघभावना जागृत होण्यास मदत होते.मुलांमधील अंगभूत कलागुण बाहेर येण्यास वाव मिळतो. भूगोलाच्या जवळ व इतिहासाच्या जवळ जाण्याची संधी.जस जशी मुले मोठी होऊ लागतील तशी ती किल्ल्यांबद्दल अजून माहिती गोळा करायला सुरुवात करतील. पुढे जाऊन त्यांच्यामध्ये त्या किल्ल्यांना भेट देण्याची इच्छा उत्पन्न होईल आणि ते इतिहासाच्या आणखी जास्त जवळ पोहोचला असा पण हेतू असतो.

किल्ला बनवायची सुरुवात…

सर्वप्रथम किल्ला कोणता करावा. शिवनेरी राजगड सिंहगड सिंधुदुर्ग अशा किल्ल्याची माहिती व चित्र सहज सोशल मीडियावर उपलब्ध होतात.. किल्ला बनवणे हे खर्चिक काम आहे. त्यासाठी योग्य निधी आवश्यक आहे. कोणता किल्ला करायचा आहे याची नियोजन करून त्या किल्ल्याच्या संबंधित देखावा विचार करावा. किल्ला बांधण्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार दगड माती विटा पोथी गोळा करून दुसरा कागदाच्या लगद्यापासून व तिसरा पीओपी पासून बनवतात. काहींना जागेची वेळेची आणि मुख्य म्हणजे किल्ले साठी लागणाऱ्या दगड मातीची अडचण असल्याने बाजारामध्ये रेडमी किल्ले मिळतात पण मातीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते मुलांनाही ईतिहास गड कोटाची जवळून ओळख व्हावी. ती इच्छा व हेतू रेडिमेड किल्ल्यात तयार होत नाही. व इतिहासाचे प्रेम ही निर्माण होत नाही..

किल्ला बांधताना…..
ज्या जागेत किल्ला बांधायचा आहे ती जागा. वर छत असावे,चारही बाजूंनी जागा मोकळी असावी.खाली जमीन असेल तर काम आणखी सोपे होते.काही ठिकाणी जागा ,पाणी व साहित्य असेल तरी अनेकदा प्रश्न पडतो की पुढे काय करायचं…काही नुसते मातीचे ढिगारे करून मोकळे होतात ..आपल्याला नुसता डोंगर उभारून योग्य नाहीतर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा गड करायचं हे हे लक्षात पाहिजे ..किल्ल्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत जमिनीवरील भुई कोट , पाण्यामधील जलदुर्ग तर डोंगराळ भागात असणारा गिरी दुर्ग.. पण शक्यतो सर्व जण डोंगरी किल्ल्याना प्राधान्य देतात. पण किल्ले हे वेगवेगळ्या धाटणीचे उभारले गेले पाहिजे .त्यासाठी trekshitz या गूगल पेज वर माहिती व नकाशा उपलब्ध आहेत.इथून नकाशा घेवून इतर साहित्य ची जमवाजमव करणे.. थोडक्यात
साहित्य – किल्ल्याचा नकाशा ,माहिती फ्लेक्स ,स्थळदर्शक पाटी, 10*10 जागा, पाणी, दगड ,विटा, भर टाकण्यासाठी डबर, पोती, फावडे ,घमले, चाळणी, दोन फूट काठी अन् खरात्याची काडी, प्लय भुसा, स्पंज, तारा, ब्रश, नाराल्याच्या करवंटी, छोटी झाकणे, काडी पेटी, दोरा, फूट पट्टी, सलाईन बॉटल, पुठ्ठे, भगवा व चॉकलेट घोटीव कागद, स्केचपेन,पांढरा कागद, कात्री, स्केच्पेन छ्त्रपती शिवाजी महाराज व मावळे,pop, हिरवा, पोपटी , ब्लॅक वॉटर कलर, हिरवी पोपटी रांगोळी रंग,

गडाची रचना….

गड ,कोट किल्ला, दुर्ग अशा विविध संरचनेत येणारी ही वास्तू इतिहासकाळी लढायचे आक्रमणाचे संरक्षणाचे राहण्याचे वस्तीचे तेहळणीचे आणि सर्वात महत्त्वाचे राज्यकारभारचे साधन होते. पाण्या ची सोय आणि गडावर मंदिरे दिसतात. गडाच्या पोटात कोरीव गुहा लेण्या घडलेल्या असतात. वस्ता, मेट अन् गाव नांदत असतात. त्याच्या शिवाय शेती,नद्या तलाव धरणे असतात. म्हणून गडाला आकार देताना त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

किल्ल्या साकारताना

10*10 जागा विटाचा चौकोन करून त्या मध्ये किल्ल्याचा नकाशा ठेवून सुतळी ने किंवा खडी ने आखणी करावी..बॉर्डर ला दगडी लावून आत मध्ये विटा, डबर, तुटलेल्या कुंड्या,लावून 2.5 फूट उंचीचा भरून घ्यावा .गडाला बालेकिल्ला असेल तर दगडी लावून फुगवटा निर्माण करावा .गडाच्या कडेने काठी किंवा विटा लावून त्यावर पोटे अंथरूण रांगा करून घ्यावे.संपूर्ण किल्ला मातीचा चिखल करून थापून घ्यावा.किल्ल्यावर असणाऱ्या बुरुज ,दरवाजा,तटबंदी, टाके मंदिरे वास्तू ची जागेची नोंद करून घ्यावी.. झाकण किंवा नारळाच्या करवंटी द्वारे टाके ,तलाव, गुहा व लेणी ची निर्मिती करावी, सुकी माती चाळून त्याचा घट्ट चिखल करून तटबंदी , बुरुज , दरवाजा करून घ्यावे . दगडी वाटण्यासाठी त्यावर चौकोन साठी तारे ने ओरखडे करणे . फूट पट्टी च्या साह्याने पायऱ्या करणे, गडावरील मार्ग दाखवणे .घरे ,मंदिरे,सदर, वाडे दाखवण्यासाठी पुठ्ठे वापर करणे . गडाचे बांधकाम पूर्ण झाले..आता सजावटी काम….

किल्ला सजावटी साठी…

किल्ला पूर्णपणे वाळून झाल्या नंतर पूर्ण किल्ल्याला पीओपी मारून घेणे. संपूर्ण किल्ला पांढरा करणे पीओपी वाळल्यानंतर किल्ला मध्ये कडक आणि कणखर पण येतो. त्यानंतर कॉम्प्रेसर च्या साह्याने पूर्ण किल्ला ब्लॅक वॉटर कलर मारावा. गडावरील पुन्हा स्थळ दर्शक ठिकाण पुन्हा अधोरखित करावी .त्याचे मार्ग काव नी दाखवावे.तटबंदी ,दरवाजे व वास्तू सोडून पूर्ण किल्ल्यावर हिरवा+ पोपटी – जरा पिवळा रांगोळी रंग चाळणी द्वारे गडावर टाकावा. जंगलं साठी लाकडी भुसा कलर करून सुध्धा वापरू शकतात .तारेला चा स्पज चा चुरा करून लावून झाडे दाखवू शकतात .प्रत्येक वास्तू ला नावे लावावी .भगवाघोटीव कागद द्वारे पताके लावावे. ..गडाच्या खाली मोकळ्या जागेत गावे, मेट , वस्त्या ,शेती , भाजी मंडई,खुस्तीचे मैदान ,नदी दाखवणे..गावातील पालखी सोहळा किंवा जत्रा दाखवणे. धबधबा दाखवण्यासाठी सलाईन बॉटल चा वापर करून ते नदीत करून त्यात होड्या सोडणे… छ्त्रपती शिवाजी महाराज, अष्टप्रधान व मावळे ठेवावे..एका कोपऱ्यात शिवमूर्ती चे पूजन करावे. पाडव्याला किल्ल्याभोवती दिव्यांची आरास करावी. संपूर्ण किल्ल्याची माहिती फ्लेक्स लावावा.एक व्यक्ती किल्ल्याची माहिती सांगण्यास ठेवावा.आयोजन केलेल्या प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यावा…

किल्ले बनवणे ही महाराष्ट्राची परंपराच आहे पण आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना आगळे वेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाची गड किल्ले प्रतीके आहेत. महाराष्ट्राच्या गत वैभवाची साक्षी देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षतेमुळे ढासळू लागले असताना त्या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांना हवी या उद्देशाने सुरू झालेल्या दिवाळीतील किल्ले बनवण्याचा उपक्रम कमी होऊ लागला आहे .. ……चला तर मग या दिवाळीला एक किल्ला नक्कीच बनवूया..

लेखक —
मंगेश अशोक नवघणे
किल्ले कलाकार
संस्थापक – स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान. महा
आजीवन सदस्य – भारत इतिहास संशोधक मंडळ

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये