लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याचे आज मतदान; जाणून घ्या राज्यात कुठे किती मतदान झाले
Lok sabha election phase 2 voting today : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (ता.२६) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रासह देशातील १२ राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघांत मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात १२०६ उमेदवार आपले नशिब आजमावण्यासाठी रिंगणात आहेत.
दुसऱ्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार असले तरी मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, या टप्प्यात १.६७ लाख मतदान केंद्रांवर १६ लाखांहून अधिक मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की या टप्प्यात १५.८८ कोटींहून अधिक मतदार आहेत, ज्यामध्ये ८,०८ कोटी पुरुष, ७.८ कोटी महिला आणि ५ हजार ९२९ तृतीय पंथिय मतदार आहेत. ३४.८ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणारे तर २०-२९ वयोगटातील ३.२८ कोटी मतदार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात कोणती राज्ये ?
यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. याआधी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. पहिल्या टप्प्यात १९ राज्ये आणि २ केंद्र शासित प्रदेशांमध्ये मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मिर, त्रिपूरा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ८ जागांसाठी मतदान
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात आठ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये हिंगोली, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, नांदेड आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे. आठही मतदारसंघात तुल्यबळ लढती पाहायला मिळत आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने दुसऱ्या टप्प्यात तरी लोक मतदानासाठी बाहेर पडणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
राज्यातील ८ मतदार संघात सकाळी ७ ते ९ पर्यंत ८ टक्के मतदानांची नोंद
वर्धा -७.१८ टक्के
अकोला – ७.१७ टक्के
अमरावती -६.३४ टक्के
बुलढाणा – ६.३१ टक्के
हिंगोली – ७.२३ टक्के
नांदेड – ७.१३ टक्के
परभणी – ९.७२ टक्के
यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के