Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी मुंबईचीच!
Mumbai Beats Vidarbha in Ranji Trophy Final 2024 : मुंबईच्या संघाने विक्रमी 42 व्यांदा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील संघाने या हंगामात अष्टपैलू कामगिरी करत अंतिम सामन्यात विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. विदर्भच्या संघानेही कडवा प्रतिकार करत मुंबईला सहज विजय मिळवू दिला नाही. अक्षय वाडकर, करूण नायर आणि हर्ष दुबे यांनी मुंबईने दिलेले डोंगराएवढे लक्ष्य गाठण्याचा आठोकाठ प्रयत्न केला खरा पण मुंबईच्या शिलेदारांनीही काही शेवटपर्यंत माघार घेतली नाही आणि रणजी करंडकावर आपले नाव कोरले. धवल कुलकर्णीने त्याच्या अखेरच्या रणजी सामन्यात शेवटच्या षटक टाकत 10वी विकेट घेतली आणि मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन संघ ठरला.
पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा डाव सुरू झाला तेव्हा विदर्भचा संघ 5 बाद 248 धावांवर खेळत होता. त्यांना विजयासाठी 290 धावांची तर मुंबईला 5 विकेट्सची गरज होती. अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेची जोडी मैदानात पाय रोवून उभी होती. वाडकरने रणजी फायनलमधील त्याचे दुसरे शतक पूर्ण केले होते.पण नंतर 9 चौकार आणि 1षटकार लगावत 102 धावा करणाऱ्या शतकवीराला मुंबईच्या तनुष कोटीयनने शतकी खेळी केलेल्या अक्षय वाडकरला पायचीत करत विदर्भ संघाला मोठा धक्का दिला.
तनुषनंतर तुषार देशपांडेने दुबेला झेलबाद करत विदर्भाच्या आशांवर पाणी फेरले. त्यानंतर आदित्य सरवटेची विकेटही देशपांडेच्या नावे होती. तनुष कोटीयनने षटकार लगावणाऱ्या यश ठाकूरला क्लीन बोल्ड केले. नंतर अजिंक्यने शेवटच्या विकेटची जबाबदारी अनुभवी धवलवर सोपवली आणि त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने उमेश यादवला क्लीन बोल्ड करत सामना मुंबईच्या नावे केला.