मुंबईला हादरवणारी घटना; फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत मित्राच्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार
मुंबई | राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली असून या यादीत मुंबई पहिल्या स्थानावर आहे. अशातच घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत दोन जणांनी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तिच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मात्र, घटनास्थळ मुंबईच्या पंतनगर येथील असल्याने सांगली पोलिसांनी हे प्रकरण पंत नगर पोलिस ठाण्यात वर्ग केले. पीडित महिलेला फिर्याद देण्यासाठी पंतनगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पंत नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवले यांनी दिली.
घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई कॉलनी परिसरात ९ ते १० डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता तिचा पती तिला घेऊन त्याच परिसरातील नवीन बांधलेल्या इमारतीमध्ये घेऊन गेला. जिथे त्याने तिची ओळख दोन पुरुषांशी करून दिली. त्यावेळी दोघांनी पीडितेच्या पतीला बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेच्या पतीकडे राहत्या घराचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. त्याच्या दोन मित्रांनी त्याला प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचे वचन दिले. पंरतु, त्याच्यासमोर पीडिताशी शारीरिक संबंध ठेवण्यास परवानगी देण्याची अट ठेवली. पीडिताच्या पतीने त्यांची विनंती मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे तिला घटनास्थळी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर पीडिताच्या पतीने पीडिताचे हातपाय बांधले. तर, इतर दोघांनी आलटून पालटून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
घटनेच्या दिवशीच पीडित महिला तिच्या माहेरी सांगलीला निघून गेली, जिथे तिने पतीसह तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली. परंतु, घटनास्थळ हे पंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सांगली पोलिसांनी हे प्रकरण वर्ग केले. सांगली पोलिसांनी मूळ एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (१), ३७६ (ड), ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.