ताज्या बातम्यापुणे

Pune Metro:मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा! पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गाचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी सेवा सुरू

पुणे | पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन करण्यात आले. याचवेळी रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devdndra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील सहभागी झाले होते.(Pune Metro)

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग ५.५ किलोमीटरचा असून ५ फेब्रुवारीला या मार्गावर मेट्रोची चाचणी झाली होती. यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या ७ किलोमीटर आणि वनाज ते गरवारे ५ किलोमीटर मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय ६.९१ किलोमीटर आणि गरवारे ते रुबी हॉल ४.७५ किलोमीटर अशा विस्तारित मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.

पंतप्रधानांच्या हस्ते बुधवारी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या ५.५ किलोमीटर मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजनही करण्यात आले. हा मार्ग ४.४ किलोमीटरचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हा मार्ग निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये