दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; हात फ्रॅक्चर, खुब्याला मार
पुणे | मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मात्र ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत. बारामती, मावळ आणि शिरुर या तिन्ही लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण अशा चर्चा सुरु आहे. अजित पवार गटातून या लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्यात येणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी पक्षाचे तगडे नेते म्हणून वळसे पाटलांवर आहे. मात्र ऐन निवडणूक तोंडावर आली असताना आणि प्रचार सुरु करायच्या आधीच वळसे पाटलांचा अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे पाटीलांना आता घरातूनच सुत्र हालवावी लागण्याची शक्यता आहे.