पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जाहिरात फलकांची १५ दिवसात तपासणी होणार
पुणे | शहरात काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाने वाघोली येथे मोठा जाहिरात फलक चारचाकी वाहनावर कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
आकाशचिन्ह विभागाने १५ दिवसांच्या आत शहरातील सर्व जाहिरात फलकांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महापालिकेच्या पाच परिमंडळांना देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांत शहरात पावसाळ्यात झाडे, तसेच जाहिरात फलक कोसळण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. मागील वर्षी देहूरोड येथे जाहिरात फलक पडून काही नागारिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महापालिकेने दरवर्षी जाहिरात फलक नूतनीकरण परवाना देताना संबंधित जाहिरात फलकांचे महापालिकेने निश्चित करून दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक केले आहे.
त्यानुसार संबंधित जाहिरात फलकांच्या मालकांकडून ते करण्यात आले असून, ते महापालिकेसही सादर करण्यात येते. मात्र, त्यानंतरही दुर्घटना घडल्यास नुकसान टाळण्यासाठी आकाशचिन्ह विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ऑडिट रिपोर्टप्रमाणे जाहिरात फलक सुस्थितीत आहे की नाही, याची पहाणी करण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या असून, १५ दिवसांच्या आत त्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
१५ मे पूर्वी धोकादायक झाडांची छाटणी
जाहिरात फलकांसोबतच महापालिका हद्दीतील धोकादायक झाडांच्या फांद्या, तसेच धोकादायक झालेली झाडे १५ मे पूर्वी छाटणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना उद्यान विभागास देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात शहरात सर्वाधिक झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून, त्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून, तसेच त्यासाठी आवश्यक असलेली मान्यतांची प्रक्रिया पूर्ण करून ती झाडे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत