ताज्या बातम्यारणधुमाळी

आरंभ है प्रचंड.. म्हणत सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंची जोरदार तयारी

सातारा | एकीकडे उन्हाचा पारा चढला असताना राजकीय वातावरणही तापायला लागले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. भाजपाने राज्यात आत्तापर्यंत २३ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली मात्र, त्यामध्ये पहिल्या २० जणांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांनी भाजपाविरुद्ध भूमिका घेतली होती. तर आता भाजपाने ३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, तरीही उदयनराजेंच्या नावाची घोषणा झालेली नाही.

अशात मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वागत सोहळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. आरंभ है प्रचंड…, असे वाक्य पोस्टरवर लिहित उदयनराजे यांचे फोटो भाजपच्या चिन्हासहित सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत. या पोस्टरची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी खासदार उदयनराजे या मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांच्यात दिल्ली येथे बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत उदयनराजेंना उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सूत्रांचे सांगणे आहे.

त्यानंतर उदयनराजे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उदयनराजेंचा भव्य स्वागत सोहळा आयोजित केला आहे. बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी दुपारी तीन वाजता सातारा जिल्ह्याची बॉर्डर असणाऱ्या नीरा नदी पूल शिरवळ येथून या स्वागत सोहळ्याला सुरुवात होईल.

शिरवळ ते सातारा येथे उदयनराजेंचे निवासस्थान जलमंदिरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भव्य सत्कार आणि स्वागत सोहळा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून माहिती दिली जात आहे. या स्वागत सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये