ताज्या बातम्या

मी शरद पवार आहे! 

होय! तुम्ही शरद पवारच आहात. तुमच्या धमक्यांना घाबरून राजकारण करणाराच येथे गुण्यागोविंदाने राहू शकतात, हे आम्हाला माहित आहे. ‘मी शरद पवार आहे,’  ही तुमच्या लोणावळ्यातील जाहीर सभेतील धमकी म्हणजे, तुम्ही आयुष्यभर केलेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीचे समर्थनच आहे. मोठमोठ्या घटनांनी आणि त्याच्यातून निघालेल्या निष्कर्षांनी तुमच्यावरती हा ठपका महाराष्ट्राने यापूर्वीच ठेवलेला आहे. आम्ही दाऊदच्या सलोख्याच्या बातम्याही विसरलो नाही. मूलचंद शहा,  चौक्सी याचे स्नेह आमच्या नजरेआड नाही, तर काल शेजारीच बसलेले मदन बाफना आम्ही विसरू शकत नाही. उल्हासनगरचा पप्पू कलानी असू द्या किंवा विरारचे ठाकूर किंवा सोनवणे बंधूंच्या हत्येतील आप्पा लोंढे… तुम्ही शरद पवार आहात, हे आम्ही विसरूच शकत नाही.

मी शरद पवार आहे, हे तुम्ही आज सांगत असला, तरी तुमची ही दहशत आजची नाही. अनेक दशकांपूर्वीपासूनची आहे. तुमची सगळ्यात मोठी भीती आम्हाला १९९५ साली वाटली होती.  ज्यावेळी व्होरा समितीचा अहवाल संसदेमध्ये सादर केला गेला. इतर वेळी एकमेकांच्या उरावर बसणाऱ्या राजकारण्यांनी एकत्रितपणे त्या अहवालाला विरोध केला. बारा पानांच्या त्या अहवालामध्ये अनेक संवेदनशील बाबी होत्या.  प्रमुख राजकीय नेते आणि माफिया यांच्यात किती जवळीक आहे, यावर प्रकाश टाकणारा तो अहवाल पटलावर आजपर्यंत येऊ दिला गेला नाही. परंतु, ‘आउटलूक’च्या माध्यमातून व्होरा कमिटीचा अहवाल इंग्रजी माध्यमांमध्ये प्रकाशित झाला आणि ‘मी शरद पवार आहे,’  ही भीती दाट झाली. शरद पवार यांनी हितेंद्र ठाकूर याला उमेदवारी दिली. तेव्हा भाई ठाकूरवर ‘टाडा’ लागला होता. राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणारे पवार यांची येथे पहिली ओळख पटते.  १९९३ साली झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटानंतर गृहखात्याने कुख्यात दाऊद आणि काँग्रेसी नेते यांच्याशी संबंधाबाबत माहिती संकलित केली.  त्या अहवालात महाराष्ट्रातील कुख्यात गुन्हेगार व त्यांना पाठीशी घालणारे राजकारणी अधिकारी यांची नावे होती.  त्यानुसार कुख्यात दाऊदचे शरद पवार,  सलीम झकारया, जावेद खान (पवारांची जवळीकता असलेले माजी मंत्री) यांच्याशी संबंध होते. गृह खात्याच्या अहवालानुसार दाऊद आणि शरद पवार या दोघांचे परस्परांशी गाढे संबंध होते. या अहवालानुसार दाऊदसाठी काम करणारा मूलचंद शहा उर्फ चौक्सी हा हवालातील सूत्रधार याने डिसेंबर १९७९ ते ऑक्टोबर १९९२ या कालावधीत पवारांना ७२ कोटी रुपये वेळोवेळी दिले.  मोहम्मद डोसा याचे मदन बाफना (जे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि काल लोणावळा येथील सभेत त्यांच्या शेजारी बसले होते) यांच्याशी सुसंबंध होते. म्हणूनच शरद पवार हे जेव्हा एखाद्याला जाहीरपणे धमकावतात की, मी शरद पवार आहे विसरू नका,  त्यावेळी ती गांभीर्याने घेण्याची बाब असते. उल्हासनगरचा पप्पू कलानी हा ‘टाडा’तील आरोपी असो किंवा विरारचा हितेंद्र ठाकूर या दोघा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना राजकारणात आणले, ते शरद पवार यांनी. संपूर्ण महाराष्ट्रात त्यामुळे पवारांविरोधी जनमत गेले होते. हे महाराष्ट्र विसरणार नाही. परंतु पवारसाहेबांच्या धमकी मागे एक आंतरिक भीती जाणवते आहे. सध्या ते त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. लोणावळा येथे सभेला कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित नव्हते, ही बाब शरद पवार यांना अस्वस्थ ठरली असावी. हेची फळ काय मम तपाला, अशी भावना त्यांच्या मनात आली नसेलच, असे नव्हे.

इतकी दशके त्यांनी राखलेला बारामती गड आज अजित पवारांच्याकडे जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यांची सुकन्या सुप्रिया सुळे या आपल्या राजकीय उत्तराधिकारी असतील, असे पवारांनी मागेच जाहीर केले होते. त्यांचेही राजकीय भवितव्य आज धूसर झाले आहे. सुप्रिया सुळे लोकसभेला पराभूत होण्याचीच शक्यता जास्त. शेजारील इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर तसेच खुद्द बारामती येथून सुप्रिया सुळे विरोधात मतदान होणार असल्याचे दिसून येत आहे. इंदापूरातील हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये मागेच प्रवेश केला आहे. दौंड मध्ये राहुल कुल हे तर पवारविरोधी म्हणूनच ओळखले जातात. पुरंदरमध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. भोरमधील थोपटे फारतर पवारांच्या मागे थांबू शकतात. खडकवासला हा तर भाजपचा बालेकिल्ला. म्हणूनच पवारांचा संयम लोणावळा येथे संपुष्टात आलेला दिसतो. अशावेळी मदन बाफना हे त्यांच्यासोबत असणे, हा योगायोग नक्कीच नाही. गळ्यापर्यंत पाणी आले, तर माकडीणही आपल्या पिल्लाला पायाखाली घेते. म्हणूनच पवार हे गर्दी नाही, हे पाहून संतप्त होणे अत्यंत स्वाभाविक होते. काही वर्षांपूर्वी वाळूच्या ठेक्यावरून पुणे जिल्ह्यात सोनवणे बंधुंची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यातील सूत्रधार अप्पा लोंढे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या जवळचा असल्याची चर्चा त्यावेळी पुणे जिल्ह्यात होती. पवार यांनीच राजकारणीचे गुन्हेगारीकरण केले, असे म्हणूनच म्हटले जाते. मदन बाफना हा त्यांचा जुना, विश्वासू साथीदार सोबत असताना, म्हणूनच पवार हे व्यासपीठावरून धमकी देते झाले. लोणावळा आणि तेथील सभेचे पडसाद येत्या काळात महाराष्ट्रात उमटत राहणार, हे मात्र नक्की. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये