लाव रे तो व्हिडीओ! पवारांनी भरसभेत लावला मोदींचा 2014 तो व्हिडीओ
सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब इथे बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हीडिओ दाखवला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं जुनं भाषण ऐकवलं.
गेले दहा वर्षे देशात भाजपकडं सत्ता आहे. मोदींच्या हातात देशाचा कारभार आहे. अनेक आश्वासन दिली कि मी महागाई कमी करणार. 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत 5 रुपयाच्या खाली आणणार 2014 आधी पेट्रोलची किंमत 72 रुपये होती. पण आज 106 रुपये किंमत आहे. निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. लोकांची फसवणूक सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले.
मोदी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
सत्तेत यायच्या आधी गॅस सिलेंडर स्वस्थात देऊ असं मोदींनी सांगितलं. तेव्हा गॅसची किंमत 460 होती. आज ती 1100 च्या वर गेली आहे. दहा वर्षात बेकारी कमी करू असे सांगितले. पण देशातील 100 पैकी 87 तरुण बेरोजगार आहेत. दहा वर्षात नोटा बंदी केली, त्यामुळे बँकेच्या दारात 700 लोकं दगावली, असं शरद पवार यावेळी म्हणाले
नरेंद्र मोदींवर घणाघात
सामान्य माणसांच्या अधिकारावर गदा आणली जातेय. अरविंद केजरीवाल हे 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी चांगले काम केले पण त्यांना तुरुंगात टाकलं. देशाच्या राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. मोदींचं सर्व कामकाज हुकूमशाहीच्या दिशेने चाललं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्यातील 10 वर्षे तुरुंगात घालवली. त्याच्यावर देशाचे पंतप्रधान टीका करतात. आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले या सर्वांनी देशाचा विचार केला. मात्र हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही, असं शरद पवार म्हणाले.
मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विजय दादा झेडपी अध्यक्ष होते. सोलापूर जिल्ह्यात 5 लाख लोकांना दुष्काळी मदत केली. मोदींच्या मनात आले आणि कांदा निर्यातबंदी केली. साखर उत्पादनात राज्य एक नंबर ला होते पण साखरेवर निर्यात बंदी केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्या लोकांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे, असं आवाहन शरद पवारांनी उपस्थितांना केलं.