संडे फिचर

स्वागत दिप पर्वाचे

नवरात्र संपले की वेध लागतात ते दिवाळीच्या तयारीचे, आजकाल सणवारांच्या शुभेच्छांइतकेच त्यांच्या तयारीबद्दलही मेसेज येत असतात. मागील काही दिवसांपासून मोबाइलवर एक मेसेज सगळीकडेच फिरतोय, तो म्हणजे दिवाळीची साफसफाई त्यानेच करावी ज्याच्या नावावर घर आहे.

विनोदाचा भाग सोडला, तर हा मेसेज आपल्याला सुचवतो, की दिवाळी जवळ आली आहे लागा तयारीला. हा मेसेज वाचला आणि मीसुद्धा दिवाळीची तयारी हा विषय थोडासा गांभीर्याने घेतला. गत दोन वर्षांत दिवाळी तर झाली, पण तेवढा उत्साह कोरोनाच्या अस्तित्वामुळे जाणवला नाही. या वर्षी मात्र दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा हे सगळे सण अगदी दणक्यात साजरे झाले. मग आता दिवाळी तरी कशी अपवाद राहील.

दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या फराळाच्या जाहिराती, कपड्यांवरचे सेल, त्यावरचे डिस्काउंट, सजावटीच्या वस्तू, रांगोळ्यांचे आकर्षक रंग आणि गिफ्ट आर्टिकल्स या सर्वांनी बाजारपेठा अगदी सजल्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हलसुद्धा सुरू आहेत. ज्यामधून मिळणारे घसघशीत डिस्काउंट आपल्याला खरेदी करण्याला उद्युक्त करतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं, की डिस्काउंटमध्ये मिळत आहेत म्हणून फारशा आवश्यक नसलेल्या वस्तूंची सुद्धा आपण खरेदी करतो. त्यामध्ये पहिला नंबर असतो तो म्हणजे विविध प्रकारचे ड्रेस, शोभेच्या वस्तू आणि त्यानंतर किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टींचा.

खरं तर या आपल्याकडे असतातच. तरीसुद्धा नवनवीन डिझाईन आणि आकर्षक रंग आपल्याला भुरळ घालतात या सगळ्या गडबडीमध्ये खरेदी तर होऊन जाते आणि त्या खरेदीने सगळे घर भरून जाते. या सगळ्या गडबडीत काही शॉपिंग जमते, तर अनेक वेळा ती फसतेसुद्धा. अशा वेळी थोडंसं नियोजन केलं, मग ते शॉपिंगचं असो, दिवाळी फराळाचं असो अथवा दिवाळीत येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी; तर ते नक्कीच फायद्याचे ठरते.

त्यासाठी सर्वप्रथम दिवाळी कशी आणि कुठे साजरी करायची आहे हे निश्चित करावे. जसे की या दिवाळीच्या सुटीत फिरायला कुठं जायचं आहे, का घरीच फक्त कुटुंबातील सदस्यांनी मिळून दिवाळी साजरी करायची आहे. फिरायला जाण्याचा प्लॅन असल्यास त्यानुसार तयारी करावी. ती म्हणजे कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे. त्याचं बुकिंग, सोबत काही दिवाळी फराळ बनवून न्यायचा आहे की ऑर्डर करायचा आहे आदी.

घरी सर्व कुटुंबासोबत दिवाळी साजरी करायची असेल आणि फराळसुद्धा घरी बनवायचा असेल, तर अशा वेळी एका वहीवर संपूर्ण कामाची यादी करावी. कपडा खरेदी, कुणा कुणासाठी, ऑनलाइन का ऑफलाइन हे सर्व निश्चित करावं. त्याचबरोबर वाणसामान, सजावटीच्या वस्तू इत्यादी गोष्टींचा समावेश या यादीमध्ये करावा. अजूनही ही यादी लांबू शकते. प्रत्येकाच्या गरजेनुसार ही यादी वाढू शकते.

दिवाळी फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या सामानाची यादी जेव्हा आपण करतो त्या वेळेस त्यामध्ये फराळाचे किती प्रकार करायचे, गोड किती, तिखट किती हे घरातील सर्वांच्या आवडीने ठरवले, तर त्याप्रमाणेच तयारी करावी. त्याचीसुद्धा बेसिक तयारी करावी ती म्हणजे दाणे भाजुन घेणे.त्याचं कूट करून घेणे. खोबरे किसून ठेवणे, तिळाची पुड करणे, तसेच काजू-बदाम-पिस्ते यांचे काप कुरून फ्रिजमध्ये ठेवावेत. ही छोटीशीच कामे पण ऐन वेळची धावपळ वाचवतात. अशा अनेक गोष्टी आहेत.

ज्यांची आधी पूर्वतयारी केली तर नंतरचा वेळ वाचतो आणि आपण ठरवलेले काम कमी वेळात पूर्ण होते. तसेच सणांच्या दिवसात ऐनवेळी होणारी धावपळ वाचवायची असेल तर शक्यतोवर बाहेरून आणण्याच्या वस्तूची खरेदी आधी करून त्यानंतर घरातल्या कामांना सुरुवात करणे सोयीचे होते. सध्या बाजारातली गर्दी पाहता जाण्या येण्यासाठी लागणारा वेळ पाहता तो वाचवण्यासाठी खरेदी थोडी लवकर करणे केव्हाही चांगले. आपण नियोजनपूर्वक गोष्टी केल्या, तर सणाचा आनंद द्विगुणित होईल यात शंकाच नाही.

हे कराच!

१. दिवाळीच्या तयारीचे सर्वप्रथम एका डायरीत नियोजन करा
२. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या पानांवर यादी तयार करा
३. गृह सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू, ड्रेस, साड्या, ज्वेलरी इत्यादी
४. वाण सामानाची यादी, दिवाळीच्या फराळासाठी बनणारे पदार्थ घरी किती बनवायचे बाहेरून काय काय आणायचे?
५. दिवाळीच्या दिवसात घरी बनणाऱ्या जेवणाचा मेनू ठरवावा. त्यानुसार आवश्यक असेल तर ते सुद्धा सामान आणून फ्रिजमध्ये ठेवता येईल जसे की मसालेभातासाठी लागणारे फ्रोजन ग्रीन पीस पॅटिस बनवायचे असतील, तर स्वीट कॉर्न आणून घरच्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
ऐनवेळी बाजारात जाऊन या गोष्टी शोधण्याची गरज नाही.
हे शक्यतो टाळावे

१. दिवाळी जवळ आलेली असताना शक्यतो ऑनलाइन शॉपिंग टाळावी. ऑनलाइन येणाऱ्या वस्तू बऱ्याचदा वेळेत मिळतील की नाही, याची गॅरंटी नसते.
२. खरेदीसाठी दूरच्या बाजारपेठेत सणाच्या तोंडावर जाणे टाळावे कारण यामुळे प्रचंड गर्दीत आपण फार मनासारख्या गोष्टी नाही घेऊ शकत अशा वेळी होणारा मनस्ताप आपण टाळू शकतो.

  1. दिवाळीनिमित्त घरी फराळ बनवणार असाल, तर दररोज दोन याप्रमाणे पदार्थ बनवावेत म्हणजे फराळ वेळेत पूर्ण होईल.
    एकूणच दिवाळी नियोजनपूर्वक साजरी केली तर मिळणारा आनंद कैकपटीने अधिक असेल यात शंकाच नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये