राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

श्रद्धा डोळस हवी, अंधश्रद्धा नको!!

श्रद्धा म्हणजे विश्वास कोणावर ठेवल्याने घात होणार नाही. इतपत ज्ञान असावे. आध्यात्म हेच सांगते की, श्रद्धेवर माणूस तरतो खरे आहे. अर्जुन प्रज्ञावंत आहे. तर अशा सामान्य माणसांसारख्या शंका कशा विचारतो. भगवद्‌गीतेतील अर्जुन तुम्ही-आम्हीच आहोत. म्हणून या अध्यायाचा आरंभच श्रद्धाविषयीच्या प्रश्नाने होतो.

ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता:।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तम: ॥१॥

अर्जुन म्हणतो भगवंता, शास्त्रविधीला न अनुसरता जी माणसे श्रद्धापूर्वक देवांचे पूजन करतात, त्यांना मिळणारी फलप्राप्ती सात्त्विकांना मिळणारी असेल राजसतमोगुणींची असेल. अर्जुनाच्या प्रश्नानेच‌ भगवंत उपदेश सुरू होणार आहे.
माऊलींनी या शंका ओ.३४ ते ४८ मधून मांडल्या आहेत. यातील ओ.३४ ते ४० इतक्या ओव्याच पाहणार आहोत.
तो अर्जुन म्हणे गा तमालशामा!
इंद्रियां फावलिया ब्रह्मा!
तुझा बोलु आम्हा!
साकांक्षु पै जी!!३४!!
जे शास्त्रेंवांचूनि आणिकेंं!
प्राणिया स्वमोक्षु न देखे!
ऐसें कां कैपखे! बोलिलासी!!३५!!
तरी न मिळेचि तो देशु!
नव्हेचि काळा अवकाशु!
जो करवी शास्त्राभ्यासु !
तोही दुरी!!३६!!
आणि अभ्यासी विरजिया!
होती जिया सामुग्रीया!
त्याही नाही अपैतिया! तिये वेळी!!३७!!
उजु नोहेचि प्राचीन! नेदिची प्रज्ञा संवाहन!
ऐसे ठेले आपादान! शास्त्राचे जया!!३८!!
किंबहुना शास्त्राविखी!
एकही न लाहतीचि नखी!
म्हणोनि उखिविखी! सांडली जिही!!३९!!
परी निर्धारूनि शास्त्रे!
अर्थानुष्ठाने पवित्रे!
नांदतात परत्रे! साचार जे!!४०!!
माऊलींच्या ओव्या ३४ ते ४०:-

अर्जुन म्हणतो, हे सावळ्या कृष्णा (सख्यभक्तीतून आलेले संबोधन) इंद्रियांसहित ब्रह्मप्राप्ती या तुझ्या बोलासंबंधी मी साशंकच आहे. कारण तूच म्हणतोस शास्त्राधारावाचून मोक्ष नाही. हे बोलणे मला पक्षपाती वाटते. कारण ज्ञानीच फक्त मोक्ष प्राप्त करतील, मग अज्ञानींचे काय? तीर्थक्षेत्र योग्य साधनेचे ठिकाण आहे. साधना आरंभ पुण्यकाळी करावा असा संकेत आहे आणि शास्त्राभ्यासाठी बुद्धी लागते याचे एकत्रीकरण होणे काहीवेळेस कठीण आहे.

अभ्यासाला सहायक ग्रंथ उपलब्ध होत नाहीत. मग काय करणार? पूर्वजन्मातील पुण्याई नसेल तर? बुद्धीच नसेल तर? मग शास्त्र समजणे अवघड, आचरण तर दूरच राहील. इथे माऊली “नखी” शब्द वापरतात. हा शब्द घोरपड या सरपटणारा प्राणी यासंबंधी आहे. घोरपड दरीतील चढण चढताना मातीत नखे खुपसून पकड
निर्माण करते.

अभ्यासाने तर्काची पकड उपयुक्त ठरते, पण ज्ञानच नाही तर तर्काची पकड चिंतन दूरच राहील. म्हणून निरक्षर आध्यात्माच्या वाटेलाच जात नाहीत. मग हे क्षेत्रज्ञानींसाठी आहे काय असेच वाटत राहते.
उद्या आपण उर्वरित ४१ ते ४८ ओव्यांचा अभ्यास करूया.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये