देश - विदेशशिक्षणसंपादकीय

अंतराळ क्षेत्रात ‘इस्रोची’ आकाशभरारी

इस्त्रो आणखी अंतराळ मोहिमा राबविणार असून त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम गगनयानची तयारी संध्या जोरात सुरू आहे ती यशस्वी करण्यासाठी भारतीय शास्त्राज्ञ कठोर परिश्रम घेत आहे.

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान प्रगतीने जगातील सर्वच देश आश्चर्यचकित झाले आहेत. अल्पावधीत अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञानी केलेली कामगिरी पाहाता नजीकच्या काळात भारत एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाईल. संपूर्ण देशाअंतर्गत बनावटीच्या उपकरणांच्या आधारे बनवलेले क्रू मॉड्यूल यानाने यशस्वी प्रक्षेपण करून एक नवा इतिहास निर्माण केला आहे.

मानवाला भविष्यात अंतराळात घेऊन जाण्यासाठी केलेली चाचणी यशस्वी झाल्याने या चाचणीचा प्रत्येक भारतवासीयाला शास्त्रज्ञांचा अभिमानच वाटतो. अशक्य ते शक्य करण्याची क्षमता व सामर्थ्य असणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांच्या बौद्धिकतेला व कठोर परिश्रमाला सलामच केला पाहिजे, असेच काहीसे कर्तृत्व इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी केले आहे.

अथक परिश्रम, जिद्द, चिकाटीच्या बळावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा नावलाैकिक वाढविणाऱ्या महान शास्त्रज्ञांनी भारताला विज्ञान तंत्रज्ञान व अंतराळ क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. भविष्यात या संशोधनातून नवी क्रांतीचे पाऊल पडणार आहे. विकास आणि प्रगतीचे स्वप्न पाहणारा भारत खऱ्या अर्थाने महासत्तेच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. या विषयी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर सातारा यांचा विशेष लेख,

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ची निर्मिती झाली. भारताने विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय सर्वांगीण प्रगती होणार नाही. ही दूरदृष्टी असलेले हे नेतृत्व होते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या स्वप्नातील नवभारत घडविण्यासाठी प्रारंभी डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन सारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले. नंतरच्या काळात प्रो. सतीश धवन, डॉ. ब्रम्हप्रकाश, डॉ. वसंतराव गोवारीकर, डॉ. अरुणा चालम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. अरुण काकोडकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. एस. राधाकृष्णन, डॉ. कैलासवदिन सिवन आदींनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सखोल संशोधन करून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला जागतिक स्तरावर सन्मान प्राप्त करून दिला.

चांद्रयान, मंगळयान यांच्या यशानंतर भारताने जी. एस. एल. व्ही. मार्क ३ चे यशस्वी प्रक्षेपण करून भारताचा अंतराळवीर अंतराळात पाठविण्याच्या दृष्टीने एक यशस्वी पाऊल टाकले आहे. भारताने अंतराळ संशोधन क्षेत्रात अल्पावधीत केलेली प्रगती पाहाता अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स, जपानसारख्या प्रगत राष्ट्रांनी भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राची दखल घेतली आहे. भारताने प्रारंभीपासून अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णतेचा ध्यास घेऊन वाटचाल सुरू ठेवली आहे. आर्यभट या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून सुरू

झालेली आकाशभरारी कायम ठेवत जगात पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही देशाला शक्य झाली नाही ती मंगळमोहीम सर्वात कमी खर्चात यशस्वी करून दाखविली. शास्त्रज्ञांचे अथक व कठोर परिश्रमामुळेच हे शक्य झाले. भारतीय शास्त्रज्ञाने केलेली अंतराळ संशोधन क्षेत्रातील क्रांती पाहाता मंगळावर व चंद्रावर अंतराळवीर पाठविण्याचा नवा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला आहे.

अंतराळ संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञांची प्रगती पाहाता भविष्यात भारत या क्षेत्रात सर्व शक्तिमान होईल. याची जाणीव आता जागतिक स्तरावरील सर्वच राष्ट्रांना झाली आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्वावलंबी घडविण्याचा ध्यास घेऊन वाटचाल सुरू ठेवली आहे. भारताचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी यानी मेक इन इंडियाचा नारा दिला आहे.

तसेच महात्मा गांधी यांनी ही स्वदेशीचा नारा दिला होता. याच विचाराचा वारसा व आदर्श घेऊन भारतीय शास्त्रज्ञ आता नव्या जोमाने वाटचाल करीत आहेत. तंत्रज्ञान स्वबळावर विकसित करणाऱ्या जगातील काही मोजक्या देशाच्या पंगतीत भारताला आता स्थान प्राप्त झाले आहे. भविष्यात अधिक विकसित तंत्रज्ञान करण्याचा संकल्प घेऊन भारतीय शास्त्रज्ञ कठोर परिश्रम घेत आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील वेगवान पध्दतीने घडणारी प्रगती ही अमेरिका, चीन, जपानसारख्या बलाढ्य देशाना ही मान्य केली आहे. भारतीय शास्त्रज्ञाची बौद्धिकताबरोबरच विज्ञान तंत्रज्ञानातील सखोल ज्ञानाची ही या राष्ट्रानी विशेष प्रशंसा केली आहे. भारतीय शास्त्रज्ञानी अंतराळ संशोधन क्षेत्राच्या विकासाचा घेतलेला ध्यासामुळेच ही प्रगती साधता आली.

इस्ञोने गेल्या ४८ वर्षात ७८ प्रक्षेपण केली त्यापैकी जवळजवळ ६९ प्रक्षेपण यशस्वी झाली. केवळ ९ प्रक्षेपणाचे अपयश इस्ञोला आले. यावरून भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राच्या प्रगतीचा आलेख सहज लक्षात येतो. भविष्यात भारतीय शास्त्रज्ञांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे अंतराळ क्षेत्रातील विविध संशोधनाचा शोध एक आव्हान असणार आहे. आव्हान स्वीकारण्याचे सामर्थ्य नक्कीच भारतीय शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाल्याचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील प्रगतीमधून दिसून येऊ लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये