राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

संत वाङ्मय

-रवी निंबाळकर

बा तुकोबा

तीर्थाटणें एकें तपे हुंबरती |
नाथिले धरिती अभिमान ||१||
तैसे विष्णुदास नव्हती साबडे |
एकाचिया पडे पायां एक ||२||
अक्षरे आणिती अंगासी जाणिव |
इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ||३||
तुका म्हणे विधीनिषेधाचे डोही |
बुडाले त्यां नाही देव कधी ||४||

देव-देव करीत तीर्थक्षेत्री फिरलेला, देव प्रसन्न झाला पाहिजे यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केलेली व्यक्ती जर अहंकारी व उर्मट असेल तर तो त्याच गर्विष्ठ रुबाबात कायम दुसऱ्यांवर गुरगुरत असतो.
अशी माणसं उगाचच दांभिक अभिमानाला कुरवाळत असतात.
तुकाराममहाराज म्हणतात, ‘आम्ही असले व्यर्थ अभिमान बाळगणारे विठ्ठलाचे भक्त अजिबात नाहीत, कारण कोणी आमच्या पाया पडले तर आम्ही त्याच्या पाया पडतो.
उच्च-नीच, ज्ञानी-अज्ञानी असला गर्विष्ठपणा मिरवणारे आम्ही वारकरी अजिबात नाहीत.
काही पोथ्यापुराणांचा अभ्यास करणारे काही जण ज्ञानाचा भलताच अहंकार मिरवतात. स्वत:ला जरा जास्तीचं शहाणं समजतात.
जनसामान्यांत वावरताना आपल्याच तोऱ्यात वागतात. जिथं जाईल तिथं लोकांनी आपला जंगी सत्कार करावा; ज्यानं त्यानं आपल्याच नावाची महती गावी, याची अपेक्षा ठेवतात.
ज्ञानाचा गर्व असलेली अशी माणसं नेहमी अहंकारात बुडालेली असतात, त्यामुळे यांना कधीच देव भेटत नाही.
मी काशीला जाऊन आलो,
मी मथुरेला जाऊन आलो,
माझी चार धाम यात्रा पूर्ण झाली,
मी नियमित वारी करतो,
मी एवढे सगळे देव-देव करतो त्यामुळे सगळ्यांनीच माझा मान राखला पाहिजे, साऱ्या जगाने माझा सन्मान केला पाहिजे, माझ्या पाया पडले पाहिजे, असा व्यर्थ अभिमान काहीच उपयोगाचा नसतो.
पांडुरंगाच्या वारकऱ्यांमध्ये अशी गर्विष्ठ भावना कधीच नसते, कोणी आपल्या पाया पडलं तर आपणही समोरचा लहान आहे की मोठा आहे, स्त्री आहे की पुरुष, उच्चवर्णीय आहे की नीचवर्णीय आहे, असा कुठलाही आणि कसलाही भेद-भाव मनात न ठेवता अतिशय नम्रपणे त्याच्याही पाया आपण पडतो.
ही झाली लीनता, ही झाली नम्रता.
नाहीतर उगाचच पांडित्याची झूल पांघरून दांभिकता मिरवणाऱ्याला ईश्वर कधीच भेटत नसतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये